ICC Cricket World Cup 2023 : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात करणार आहे. रविवारी चेन्नईच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. या सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना विश्वचषक विजयाचा दावेदार म्हटले जात आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टीम इंडियासाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्या संघाविरोधात विजयाची सुरुवात झाल्यास भारतीय संघाच्या खेळाडूंचा विश्वचषकात आत्मविश्वास वाढलेला असेल. ऑस्ट्रेलियाचा संघही यजमान भारताचा पराभव करत विजयाने सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. त्याबाबत जाणून घेऊयात...
विराट कोहली :
भन्नाट फॉर्मात असलेल्या शुभमन गिल याच्या खेळण्यावर साशंकता आहे. गिल याला डेंग्यूची लागण झाली आहे, त्यामुळे पहिल्या सामन्यात गिल खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे विराट कोहलीची जबाबदारी वाढलेली असेल. त्यामुळे विराट कोहली पहिल्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहलीचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या साथीने भारताची धावंसख्या वाढवण्याचे काम विराट कोहली करेल. विश्वचषकातील या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला विराट कोहलीकडून खूप अपेक्षा असतील. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेमध्येही चांगली कामगिरी केली आहे. आता या विश्वचषकाच्या सामन्यात विराट किती धावा करतो हे पाहावे लागेल.
स्टीव्ह स्मिथ :
विराट कोहलीप्रमाणेच स्टीव्ह स्मिथही ऑस्ट्रेलियासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. गेल्या काही महिन्यांत स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी महत्वाच्या आणि मॅच विनिंग खेळी केल्या आहेत. भारताच्या भूमिवर स्मिथची बॅट तळपते, त्याशिवाय फिरकी खेळण्यात तरबेज आहे. त्यामुळे स्मिथच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल. जेव्हा जोव्हा स्मिथच्या बॅटमधून धावा निघाल्यात तेव्हा तेव्हा ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत राहिला आहे. वेगवान गोलंदाजांसोबतच तो फिरकीही चांगला खेळतो, अशा स्थितीत चेन्नईच्या फिरकी ट्रॅकवर स्मिथची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
जसप्रीत बुमराह :
जसप्रीत बुमराहने गंभीर आणि प्रदीर्घ दुखापतीनंतर दणक्यात पुनरागमन केले. बुमराहने पुनरागमन केल्यानंतर चांगली कामगिरी केली आहे. त्याचा गोलंदाजीचा फॉर्म चांगला दिसत आहे. या विश्वचषकात त्याने चांगली कामगिरी केल्यास भारताला विश्वचषक जिंकणे खूप सोपे जाईल. अशा स्थितीत बुमराहची ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
केएल राहुल :
भारतात होत असलेल्या विश्वचषकात केएल राहुल एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. केएल राहुल यष्टिरक्षक फलंदाज म्हणून मैदानात उतरणार आहे. विकेटकीपिंगसोबत मध्यक्रम फलंदाजी सांभाळण्याची मोठी जबाबदारी राहुलच्या खांद्यावर आहे. मधल्या फळीत राहुलचा रेकॉर्ड आतापर्यंत चांगलाच राहिला आहे. गेल्या काही डावांमध्ये राहुलने चांगली कामगिरी केली आहे. चौथ्या आणि पाच्या क्रमांकावर राहुलने दमदार फलंदाजी केली आहे. श्रेयस अय्यर खेळत असला, तर राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. याशिवाय राहुलच्या विकेटकीपिंग कौशल्यात बरीच सुधारणा झाली आहे. डीआरएस घेण्याचा निर्णय घेताना तो अनेक वेळा सक्षम असल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीत केएल राहुलच्या चाहत्यांची नजर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकावर असेल.
श्रेयस अय्यर :
मध्यक्रममध्ये श्रेयसने आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अय्यर दुखापतीचा सामना करत होता. दुखापतीनंतर अय्यरने कमबॅक केले आहे. मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेतील एका सामन्यात शतक झळकावून अय्यरने फॉर्मात परतला आहे. अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तो फिरकीचा चांगला सामना करतो, त्याला चेन्नईच्या फिरकी ट्रॅकवर अॅडम झाम्पा आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या फिरकीचा सामना करायचा आहे.