India Refuse To Have Pakistan Name On Jersey : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ आपले सामने यूएईमध्ये खेळणार आहे. ज्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. इतर संघांविरुद्धचे सामने यजमान देश पाकिस्तानमध्ये खेळवले जातील. 1996 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपनंतर पाकिस्तान पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणार आहे.
2017 नंतर पहिल्यांदाच होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. पण, या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी त्यांना भारतीय क्रिकेट संघासमोरील सततच्या आव्हानांनाही तोंड द्यावे लागेल. सुरक्षेच्या कारणास्तव, भारताने पाकिस्तानला जाण्यास स्पष्टपणे नकार दिला. आता रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघ पाकिस्तानला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे.
खरंतर, आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या देशाचे नाव प्रत्येक संघाच्या जर्सीवर लिहिलेले असते. पण, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिण्यास नकार दिल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या मुद्द्याबाबत आयसीसीकडे पाहत आहे आणि तिथून काही दिलासा मिळेल अशी आशा करत आहे.
वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, भारताला यजमान देश पाकिस्तानचे नाव जर्सीवर नको आहे. ही एक परंपरा आहे आणि सर्व संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये हे करतात. पीसीबीच्या अधिकाऱ्याने असा आरोपही केला की बीसीसीआय क्रिकेटचे राजकारण करत आहे.
अधिकाऱ्याने पुढे सांगितले, पाकिस्तानमध्ये न खेळण्याव्यतिरिक्त भारताने रोहित शर्माला उद्घाटन समारंभासाठी पाकिस्तानला पाठवण्यासही नकार दिला. पण आम्हाला विश्वास आहे की आयसीसी असे होऊ देणार नाही आणि पाकिस्तानला मदत करेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारत पाकिस्तानात जाणार नाही, यावरून चांगलाच वाद झाला होता. भारताच्या कडक भूमिका घेतल्यानंतर आयसीसीला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. यानंतर असा निर्णय घेण्यात आला की या स्पर्धेत भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळेल, तर उर्वरित सर्व सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील. दुबईमध्ये एक उपांत्य सामना देखील होणार आहे. जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर अंतिम सामनाही दुबईमध्येच खेळवला जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान सामना
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल. भारतीय संघ 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. यानंतर, टीम इंडियाच्या पुढील सामन्यासाठी काही दिवसांचा अंतर आहे, न्यूझीलंडविरुद्ध खेळला जाणार आहे.
हे ही वाचा -