Umran Malik : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील दमदार गोलंदाजीच्या जोरावर उमरान मलिकला (Umran Malik) भारतीय संघात स्थान मिळालं आहे. यानंतर आता सर्वांच लक्ष उमरान या सामन्यांमध्ये कशी कामगिरी करेल याकडे लागलं आहे. सद्यस्थितीला आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारा भारतीय म्हणून उमरानचंच नाव आहे. त्यामुळे आता उमरान जगातील सर्वात वेगवान चेंडू फेकणाऱ्या शोएब अख्तरचा रेकॉर्डही तोडेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याबद्दल स्वत:च उमरानने उत्तर दिलं आहे.


उमरानने एका स्पोर्ट्स चॅनलशी बोलताना सांगितलं की, "सध्या माझं लक्ष्य हे अख्तर यांच्या सर्वात वेगवान गोलंदाजीचं रेकॉर्ड तोडणं नसून चांगली गोलंदाजी करणं हे आहे. मी भारतासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करु इच्छित आहे. सोबतच मी 150 kmph हून अधिक वेगाने गोलंदाजी सुरुच ठेवण्याच्या तयारीत आहे."  


उमरानची आयपीएल 2022 मधील कामगिरी 


आयपीएल 2022 मध्ये उमरानने त्याच्या तुफान वेगाने सर्वांनाच आश्चर्यचकीत करुन सोडलं. त्याने गुजरातविरुद्ध एका सामन्यात तब्बल 5 गडी बाद करत विशेष कामगिरी केली. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच सामना गमावलेल्या हैदराबाद संघाच्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला. यावेळी उमरानने 4 ओव्हर गोलंदाजी करत केवळ 25 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. हंगामातील 14 सामन्यात उमरानने 21 विकेट्स घेत पर्पल कॅपच्या शर्यतीतही चांगली कामगिरी केली. याशिवाय आयपीएल 2022 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम गुजरात टायटन्सचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनच्या नावावर होता. त्यानं चेन्नईविरुद्ध सामन्यात 153.9 किमी प्रतितासानं चेंडू टाकला होता. परंतु, त्यानंतर उमरान मलिकनं 154 किमी प्रतितास वेगानं चेंडू टाकत हा रेकॉर्ड तोडला. त्यानंतर 5 मे रोजी दिल्लीविरुद्ध तब्बल 157 किमी प्रतितासानं चेंडू टाकत उमराननं स्वत:चाच रेकॉर्ड तोडला. दुसरीकडे संघात पहिल्यांदाच स्थान मिळालेल्या अर्शदीपने यंदा 14 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत.


हे देखील वाचा-