How Mohammed Shami Condition After Operation : टीम इंडियाचा (Team India) हुकुमी एक्का आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरवणारा मोहम्मद शामी (Mohammed Shami) सध्या टीम इंडियापासून लांब आहे. शामीच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून सध्या तो रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पण, चाहत्यांचा लाडका शामी मैदानात कधी परतणार याची सर्वचजण आतुरतेनं वाट पाहत आहे. आयपीएलचं (IPL 2024) काय होणार, तो खेळणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. अशातच या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बीसीसीआयनं (BCCI) दिलेल्या एका अपडेटवरुन मिळतील. 


बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार, शामीच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यावर 26 फेब्रुवारी 2024 रोजी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. सध्या तो रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच, रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर मोहम्मद शामी रिहॅब प्रोसेस सुरू करणार आहे. त्यासाठी तो बंगळुरूतील क्रिकेट नॅशनल अकॅडमीत जाणार आहे. 






दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शामीच्या पायावर शस्त्रक्रिया पार पडली. मोहम्मद शामीनं स्वतः सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. तसेच, त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी आणखी काही काळ लागेल असं म्हटलं होतं. तसेच, शामी आगामी आयपीएल 2024 मध्येही दिसणार नाही. शामीचं आयपीएलमधून बाहेर जाणं हा गुजरात टायटन्ससाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. 


वनडे विश्वचषकात सर्वाधिक विकेट शामीच्या नावावर 


मोहम्मद शामीनं नोव्हेंबर 2023 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. वनडे विश्वचषकाचा अंतिम सामन्यात शामी खेळला होता. हा सामना ऑस्ट्रेलियानं सहा विकेटनं जिंकला होता. भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल ऑस्ट्रेलियानं 4 विकेटच्या मोबदल्यात 43 षटकात हे आव्हान पार केलं होतं. भारताकडून मोहम्मद शामीनं एक विकेट घेतली होती. वनडे विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम मोहम्मद शामी यानं केला होता. शामीनं 7 सामन्यात 24 विकेट घेतल्या. 


शामीची IPL मधून माघार, गुजरातला मोठा धक्का 


वनडे विश्वचषकानंतर मोहम्मद शामी दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. दुखापत असतानाही मोहम्मद शामी यानं भारतासाठी विश्वचषक गाजवला होता. सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेलाही तो मुकलाय. मोहम्मद शामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक करण्याची शक्यता आहे.स्टार गोलंदाज मोहम्मद शामी दुखापतीमुळे आयपीएलला मुकणार आहे. हा गुजरातसाठी मोठा धक्का मानला जातोय. गुजरातनं 2022 मध्ये आयपीएल पदार्पण केले, त्याचवर्षी त्यांनी जेतेपदावर नाव कोरलं. त्यानंतर गेल्यावर्षी गुजरातला उपविजेतेपदावर समाधान मानवं लागलं. या दोन हंगमात मोहम्मद शामी यानं गुजरातकडून भेदक मारा करत विजयात मोलाचा वाटा उचललाय. पण आता दुखापतीमुळे मोहम्मद शामी आयपीएल स्पर्धेला मुकणार आहे.