Tejashwi Yadav Virat Kohli: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. तेजस्वी यादव यांनी एका मुलखतीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली माझ्या कर्णधारपदाखाली खेळला आहे, असं विधान केलं. तसेच मी एक क्रिकेटर होतो आणि याबद्दल कोणीही बोलत नाही, असंही तेजस्वी यादव म्हणाले. 


तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी क्रिकेटमध्ये कधी पदार्पण केले?, आपल्या कारकीर्दीत किती धावा केल्या?, नेमक्या किती विकेट्स घेतल्या?, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर मिळालेल्या माहितीनूसार, तेजस्वी यादव यांनी 2003 मध्ये जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यातून दिल्ली अंडर-15 संघात पदार्पण केले होते. असे म्हटले जाते की तेजस्वीच्या पदार्पणाच्या वेळी विराट कोहली दिल्लीच्या अंडर-15 संघाचा कर्णधार होता. त्यामुळे तेजस्वी यादव आणि विराट कोहली (Virat Kohli) एकत्र क्रिकेट खेळले, हे मात्र खरं आहे.


तेजस्वी यादव यांची कारकीर्द कशी राहिली?


तेजस्वी यादव यांनी आपल्या कारकिर्दीत चार टी-20 सामने खेळले आहेत. तर दोन लिस्ट एसाठी आणि झारखंड संघाकडून एक प्रथम श्रेणीचा सामना खेळला आहे. विराट कोहलीने झारखंडसाठी एकही सामना खेळला नाही. एका दाव्यानूसार, तेजस्वी यादव यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वयोगटातील क्रिकेट खेळले आहे.


तेजस्वी यादव यांनी किती विकेट्स घेतल्या?


तेजस्वी यादव यांनी दोन प्रथम श्रेणी डावात 20 धावा केल्या. याशिवाय तेजस्वी यादव यांनी लिस्ट एच्या दोन डावात एकुण 14 धावा केल्या आणि गोलंदाजीत 1 विकेट घेतली. टी-20 सामन्याच्या उर्वरित 1 डावात तेजस्वी यादव यांनी केवळ 03 धावा केल्या. तेजस्वी यादव यांनी अवघ्या एका वर्षात झारखंडसाठी प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी-20 सामने खेळले. तेजस्वी यादव यांनी 2009 मध्ये सुरुवात केली आणि त्यानंतर 2010 मध्ये शेवटचा सामना खेळला. दुखापतीमुळे तेजस्वी यादव यांनी क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.


तेजस्वी यादव यांनी आयपीएलमधून किती कमाई केली?


आयपीएल 2008 मध्ये, दिल्ली डेअरडेव्हिल्सने (आता दिल्ली कॅपिटल्स) तेजस्वी यादव यांना 8 लाख रुपयांना विकत घेतले. यानंतर आयपीएल 2009 मध्ये तेजस्वी यादव यांची बेस किंमत 8 लाख रुपये होती. मात्र, तेजस्वी यादव आयपीएल 2010 च्या सीझनमध्ये खेळले नाही, पण आयपीएल 2011 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने पुन्हा तेजस्वी यादव यांच्यावर 10 लाखांची बोली लावली. अशाप्रकारे तेजस्वी यादवने आयपीएलमधून 36 लाख रुपये कमावले.


तेजस्वी यादव नेमकं काय म्हणाले?


बिहारचे नेते तेजस्वी यादव आपला क्रिकेट अनुभव सांगून चर्चेत आले आहेत. मुलाखतीत तेजस्वी यांनी म्हटले आहे, “मी एक क्रिकेटर होतो आणि याबद्दल कोणीही बोलत नाही. विराट कोहली माझ्या कर्णधारपदाखाली खेळला आहे. याबद्दल कोणी कधी काही बोललं आहे का? एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून मी चांगले क्रिकेट खेळलो. टीम इंडियाचे अनेक खेळाडू माझे बॅचमेट आहेत. माझे दोन्ही लिगामेंट फ्रॅक्चर झाल्याने मला क्रिकेट सोडावे लागले. भारतीय क्रिकेट संघाचा भाग असलेले अनेक खेळाडू त्यांचे बॅचमेट असल्याचा दावाही तेजस्वी यादव यांनी केला.


संबंधित बातमी:


एका सामन्यात कॉमेंट्री करण्यासाठी किती रुपये मिळतात?; आकाश चोप्राने सांगितला चक्रावणारा आकडा