Virat Kohli Nervous 90 : वानखेडेच्या मैदानावर किंग विराट कोहली आणि प्रिन्स शुभमन गिल यांची शतके हुकली आहेत. मधुशंकाने दोघांनाही तंबूत पाठवले. शुभमन गिल 92 तर विराट कोहली 88 धावांवर बाद झाला. रोहित शर्मा दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यानंतर विराट आणि गिल यांनी भारताच्या डावाला आकार दिला होता. दोघांमध्ये 189 धावांची भागीदारीही झाली. पण दोघांना शतके ठोकता आली नाहीत. शुभमन गिल आणि विराट कोहली या दोघांनाही मधुशंका याने तंबूचा रस्ता दाखलवला. 


सचिनच्या विक्रमापासून विराट दूरच - 


विराट कोहलीला पुन्हा एकदा शतकाने हुलकावनी दिली. विराट कोहली वानखेडेवर वनडेतील 49 वे शतक ठोकेल, अशीच सर्वांना आशा होती. पण लयीत असणाऱ्या विराट कोहलीला मधुशंकाने तंबूत पाठवले. विराट कोहलीने वानखेडेवर रुबाबदार सुरुवात केली होती. त्याने एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देत दावसंख्या हालती ठेवली होती. शतकाच्या जवळ गेल्यानंतर विराट कोहलीची बॅट थोडी शांत झाली, अन् तिथेच श्रीलंकेच्या मधुशंकाने डाव साधला. मधुशंकाच्या गोलंदाजीवर विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीने 94 चेंडूत 88 धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने 11 चौकार लगावले. 






शुभमन गिल रंगत परतला, पण शतक हुकले - 


युवा शुभमन गिल आज लयीत दिसत होता. वानखेडेच्या मैदानावर त्याने चौफेर फटकेबाजी केली. गिल सुरुवातीला थोडा चाचपडला, पण एकदा जम बसल्यानंतर लंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने 92 चेंडूत 92 धावा केल्या. गिल याने आपल्या खेळीत दोन षटकार आणि 11 चौकार लगावले. गिल याचा डावही मधुशंका यानेच संपुष्टात आणला. 


विराट-गिल यांनी डाव सावरला - 


वानखेडेच्या मैदानात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. मधुशंका याने पहिल्याच षटकात भारताला मोठा धक्का दिला. रोहित शर्माला दुसऱ्याच चेंडूवर मधुशंकाने त्रिफाळाचीत बाद केले. पण त्यानंतर युवा शुभमन गिल आणि अनुभवी विराट कोहली यांनी डाव सावरला. सुरुवातीला संयमी फलंदाजी करत एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला. खराब चेंडूवर चौकार लगावले. दोघांमध्ये 189 धावांची शानदार भागीदारी झाली. 


श्रीलंकेची खराब फिल्डिंग - 


रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली सुरुवातीला थोडे चाचपडत खेळत होते. त्याचवेळी लंकेच्या फिल्डर्सने जीवदान दिले. गिल आणि विराट कोहली यांचे सोपे झेल लंकेच्या फिल्डर्सनी सोडले. त्याचा फटका लंकेला बसला. विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी चौफेर फटकेबाजी केली. पण लंकेने गिल आणि विराट यांना मोठी खेळी न करु देता बाद करत चूक सुधरली. विराटला 88 तर गिल याला 92 धावांवर तंबूत पाठवले.