Harry Brook Named New Vice Capain : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 टी-20 सामन्यांची मालिका 22 जानेवारी (बुधवार) पासून सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील महिन्यापासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेचा पहिला सामना ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान, इंग्लंडने दौरा सुरू होण्यापूर्वी एक मोठी घोषणा केली आहे आणि पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्यांचा नवीन उपकर्णधार जाहीर केला आहे. इंग्लंडने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हॅरी ब्रूकला त्यांचा नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.


इंग्लंडचा संघ त्यांचा व्हाईट बॉल कर्णधार जोस बटलरच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्ध खेळेल, पण युवा फलंदाज हॅरी ब्रूक उपकर्णधार म्हणून दिसणार आहे. काही वर्षांतच ब्रूकने इंग्लंडसाठी खेळाच्या तिन्ही स्वरूपात स्वतःची छाप सोडली आहे आणि त्याच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याला आता नेतृत्व पदावर स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ट्विट करत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ब्रूकला पुरुष संघाचा नवीन उपकर्णधार म्हणून घोषित केले.






ब्रूकने घेतली मोईन अलीची जागा 


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ब्रूकला यापूर्वी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. इंग्लंडने मालिका 2-3 अशी गमावली पण ब्रूकने पाच सामन्यांमध्ये 300 पेक्षा जास्त धावा केल्या. आता भारतात होणाऱ्या टी-20 मालिकेआधी अष्टपैलू मोईन अलीच्या जागी  ब्रूकला उपकर्णधार करण्यात निर्णय बोर्डाने घेतला आहे.


हॅरी ब्रुकने 2022 मध्ये इंग्लंडसाठी टी-20 मध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर पुढच्या वर्षी तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यात यशस्वी झाला. सुरुवातीला त्याला सातत्याने संधी मिळाल्या नाहीत, पण नंतर त्याने हळूहळू आपले स्थान पक्के केले. ब्रूक आता इंग्लंडसाठी एक अतिशय महत्त्वाचा फलंदाज बनला आहे.


जर आपण त्याच्या कामगिरीवर नजर टाकली तर, त्याने आतापर्यंत 39 टी-20 सामन्यांमध्ये 30.73 च्या सरासरीने 707 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 20 सामन्यांमध्ये 39.94 च्या सरासरीने 719 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक शतक आणि पाच अर्धशतके आली आहेत. इंग्लंडला भारताविरुद्ध या धडाकेबाज फलंदाजाकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असेल जेणेकरून ते मालिका जिंकण्यात यशस्वी होतील.


भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी इंग्लंडचा संघ : जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस अ‍ॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड.