न्यूयॉर्क : भारत आणि अमेरिका (IND vs USA) आज टी20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2024) आमने सामने आले आहेत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील ही शेवटची मॅच आहे. या स्पर्धेतील आज  25 वा सामना होणार आहे. भारत आणि अमेरिका या दोन संघांनी आतापर्यंत प्रत्येकी दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. भारतानं आयरलँड आणि पाकिस्तानला पराभूत केलं आहे. दुसरीकडे अमेरिकेनं कॅनडा आणि पाकिस्तानला पराभूत केलं आहे. भारत नेट रनरेटच्या जोरावर अ गटात पहिल्या स्थानावर आहे. भारतानं मिळवलेल्या दोन्ही विजयांमध्ये उपकप्तान हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) कामगिरी महत्त्वाची ठरली आहे. पांड्यानं दोन मॅचमध्ये पाच विकेट घेतल्या आहेत. यामुळं क्रिकेट चाहते हार्दिक पांड्यावर खूश आहेत. हे हार्दिक पांड्यानं कसं साध्य केलं हे, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक  यांनी सांगितलं आहे.  


हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्त्व करत होता. मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावर राहिला. मुंबईच्या खराब कामगिरीला  पांड्याला जबाबदार धरत चाहत्यांनी टीका केली. मुंबई इंडियन्सचं कॅप्टनपद स्वीकारणाऱ्या हार्दिकला मैदानांवर देखील शेरेबाजीला सामोरं जावं लागलं. हार्दिक पांड्यानं आयपीएलमध्ये 11 विकेट घेतल्या होत्या. तर, 216 धावा केल्या होत्या. 


हार्दिक पांड्यानं टीम इंडियात कमबॅक केलं अन् वातावरण बदलून केलं.  आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये भारताच्या उपकप्तान पदाची जबाबदारी हार्दिककडे देण्यात आली. हार्दिक पांड्यानं आयरलँड आणि पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये एकूण पाच विकेट घेतल्या. पाकिस्तान विरुद्ध तो चांगली फलंदाजी करु शकला नाही. मात्र, गोलंदाजीच्या जोरावर हार्दिकनं संघाला विजयाजवळ पोहोचवलं. 


टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक काय म्हणाले?


टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे  यांनी हार्दिकच्या यशाचं गुपित सांगितलं. ते म्हणाले की, मला खात्री होती की हार्दिक पांड्याकडे त्याच्या क्षमतेबाबत आत्मविश्वास होता. एखाद्या स्पर्धेत तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करुन देखील लय सापडत नाही. यासाठी वेळ लागतो. आयपीएलचा तो काळ होता त्यामध्ये हार्दिक पांड्याला लय सापडत नव्हती, असं पारस म्हाम्ब्रे म्हणाले. 


हार्दिक पांड्याची त्याच्या कामाबद्दलची निष्ठा, त्याची कठोर मेहनत याचा परिणाम आता त्याच्या चांगल्या कामगिरीत दिसत आहे. पारस म्हाम्ब्रे यांनी हार्दिक पांड्यानं समर्पण भावनेतून  नेटमध्ये सराव केला. त्यानं कठोर मेहनत केली आणि त्याला त्याची लय पुन्हा मिळाली, असं पारस म्हाम्ब्रे  म्हणाले.


हार्दिक पांड्यानं मोठ्या प्रमाणावर गोलंदाजी केली आहे. त्यातून त्याला अनेक गोष्टी समजल्या आहेत. नेटमध्ये हार्दिक पांड्यानं सराव केला. आता त्याची बॉलर म्हणून आपण कामगिरी पाहत आहोत, असं पारस म्हाम्ब्रे म्हणाले.


संबंधित बातम्या : 


IND vs USA : दुबे आणि जाडेजाला बाहेरचा रस्ता? अमेरिकाविरोधात अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11