India tour of Ireland: आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय टी-20 संघानं हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली पहिल्या सामन्यात सात विकेट्सनं विजय मिळवला. पहिल्यांदाच भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्यासाठी आयर्लंडविरुद्ध पहिला टी-20 सामना खास ठरला. टी-20 कर्णधारपदाच्या पदार्पणात हार्दिक पांड्यानं आयर्लंडचा सलामीवीर पॉल स्टर्लिंगला माघारी धाडून खास विक्रमाला गवसणी घातलीय. टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधारपद स्वीकारल्यानंतर विकेट घेणारा हार्दिक पांड्या भारताचा पहिला कर्णधार ठरलाय.
भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व करणारा हार्दिक पांड्या नववा कर्णधार
टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणारा हार्दिक पांड्या हा नववा खेळाडू आहे. त्याच्या आधी संघाची धुरा सांभाळणाऱ्या सर्व कर्णधारांना टी-20 क्रिकेटमध्ये एकही विकेट घेता आलेली नाही. आयर्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्यानं 2 षटके टाकली. ज्यात 26 धावा देऊन एक विकेट मिळवली.
भारताच्या टी-20 क्रिकेटमधील कर्णधारांची यादी-
क्रमांक | कर्णधार | विकेट्स |
1 | वीरेंद्र सेहवाग | 0 |
2 | महेंद्रसिंह धोनी | 0 |
3 | सुरेश रैना | 0 |
4 | अजिंक्य रहाणे | 0 |
5 | विराट कोहली | 0 |
6 | रोहित शर्मा | 0 |
7 | शिखर धवन | 0 |
8 | ऋषभ पंत | 0 |
9 | हार्दिक पांड्या | 1 |
आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरात टायटन्सची कमान सांभाळणाऱ्या हार्दिक पंड्यानं कर्णधारपदाच्या पदार्पणातच उत्कृष्ट कामगिरी केली. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सनं आयपीएल 2022 चं विजेतेपद पटकावलं. ज्यामुळं बीसीसीआयनं वरीष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्याकडं भारतीय -20 संघाचं कर्णधारपद सोपावलं.
भारताचा आयर्लंडवर सात विकेट्सनं विजय
आयर्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पावसाच्या वारंवार व्यत्ययामुळं सामना दोन तास उशीरा सुरू करण्यात आला. दोन्ही डावांतील 8-8 षटके कमी करण्यात आली. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडच्या संघानं 12 षटकात चार विकेट्स गमावून भारतासमोर 109 धावांचं लक्ष्य ठेवलं. आयर्लंडकडून हॅरी टेक्टर तुफानी खेळी करत 33 चेंडूत 193 च्या सरासरीनं 64 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, आवेश खान आणि युजवेंद्र चहलला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघानं 9.2 षटकातच सामना जिंकला. भारताकडून दिपक हुडानं सर्वाधिक 29 चेंडूत 47 धावांची खेळी केली.
हे देखील वाचा-