India tour of Ireland: आयर्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय क्रिकेट संघानं दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत (IRE Vs IND) 2-0 नं विजय मिळवला. या दौऱ्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडं (Hardik Pandya) भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. कर्णधाराच्या पदार्पणाच्या मालिकेत हार्दिकनं मालिका जिंकून त्याचं नेतृत्व सिद्ध केलं. या दौऱ्यात भारताचा युवा फलंदाज दीपक हुडानं (Deepak Hooda) चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. ज्यामुळं त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. आयपीएल 2022 मधील हुडाची कामगिरी पाहता त्याला आयर्लंड दौऱ्यावर भारतीय टी-20 संघात स्थान देण्यात देण्यात आलं. आयर्लंड दौऱ्यावर मिळालेल्या संधीचं दीपक हुडानं सोनं करून दाखवलं.


पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सात विकेट्सनं विजय
दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारतानं 1-0 आघाडी घेतली . पावसानं व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारतानं सात विकेट्स राखून आयर्लंडचा पराभव केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळं दोन्ही संघाना 12-12 षटकं खेळायला देण्यात आली. ज्यात आयर्लंडनं 108 धावा करत भारतासमोर 109 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात दीपक हुडाच्या नाबाद 47 धावांच्या जोरावर भारतानं 9.2 षटकातच सामना जिंकला.  


रोमहर्षक सामन्यात भारताचा चार धावांनी विजय
दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतानं 20 षटकात सात विकेट्स गमावून आयर्लंडसमोर 226 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात आयर्लंडच्या संघाला भारताला कडवी झुंज दिली. विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आयर्लंडच्या संघाला फक्त चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून शतक झळकावणारा दीपक हुडानं सामनावीर ठरला. 


दीपक हुडाची विक्रमाला गवसणी
दुसऱ्या टी-20 मध्ये दीपकला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यानं 57 चेंडूत 104 धावा केल्या. दीपकच्या खेळीत 9 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे. भारतासाठी टी-20 सामन्यात शतक झळकावणारा तो चौथा खेळाडू ठरलाय.  आंतरराष्ट्रीय टी-20  क्रिकेटमध्ये सर्वाधिक चार शतक झळकावण्याचा विक्रम भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे. त्यानंतर केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर दोन शतकांची नोंद आहे. तर, भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाहीनं टी-20 क्रिकेटमध्ये एक शतक ठोकलंय. या यादीत आता दीपक हुडाचा समावेश झालाय. 


हे देखील वाचा-