Hardik Pandya Suryakumar Yadav Ind vs SL: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तीन टी-20 सामन्यांची मालिका 27 जुलैपासून सुरू होणार आहे. यासाठी टीम इंडिया 22 जुलै रोजी श्रीलंकेला रवाना झाली आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची (Gautam Gambhir) ही पहिली मालिका असणार आहे. टी-20 फॉरमॅटसाठी टीम इंडियाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव कशा पद्धतीने कर्णधारपद हाताळतो, याकडे सर्वांचं लक्ष असेल.  


श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाने सराव सुरु केला आहे. तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसला. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.  हार्दिक पांड्याने श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवला मिठी मारल्याचा फोटो समोर आला होता. परंतु काल सराव सत्रात सूर्यकुमार यादव खेळाडूंना संबोधित करत होता. पण यावेळी हार्दिक पांड्या अनुपस्थित होता.  


गौतम गंभीरसोबत बराच वेळ चर्चा-


चर्चासत्र झाल्यानंतर हार्दिक पांड्या सराव सत्रात आला आणि गौतम गंभीरसोबत बराच वेळ चर्चा केली. यानंतर हार्दिकने नेट्समध्ये सराव सुरु केला. सूर्यकुमारने बोलावलेल्या चर्चासत्रावेळी हार्दिक हजर का नव्हता, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हार्दिक पांड्या सूर्यकुमार यादववर नाराज आहे की काय?, अशी शंका नेटकऱ्यांकडून उपस्थित केली जात आहे. 






सूर्यकुमार यादवला कर्णधार का केले?; अजित आगरकरांनी सांगितलं कारण!


सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले कारण तो पात्र खेळाडूंपैकी एक आहे. सूर्यकुमार यादव सर्वोत्तम टी-20 मधील फलंदाजांपैकी एक आहे. आम्हाला असा कर्णधार हवा आहे, जो सर्व सामने खेळू शकेल. हार्दिक पांड्याचा फिटनेस त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे. हार्दिक हा एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. परंतु फिटनेस हे एक आव्हान आहे. त्यामुळे नेहमी उपलब्ध असेल, असा एक खेळाडू हवा आहे. यासाठी सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आल्याची माहिती अजित आगरकर यांनी दिली. 


श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ-


सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रायन पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या , शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.


भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक-


27 जुलै - 1ली टी-20 (पल्लेकेले)


28 जुलै - दुसरी टी-20 (पल्लेकेले)


30 जुलै - तिसरी टी-20 (पल्लेकेले)


2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)


4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)


7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)


संबंधित बातम्या:


हार्दिक पांड्याला वगळून सूर्यकुमार यादवला कर्णधार का केले?; गौतम गंभीर अन् अजित आगरकरांनी पत्रकार परिषदेत सर्व सांगितले!


रोहित शर्मा अन् विराट कोहली कधीपर्यंत संघात असणार?; गौतम गंभीरचं पत्रकार परिषदेत धडाधड उत्तर!