Legends League Cricket : क्रिकेट जगतातील माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत, ते म्हणजे लेजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) या स्पर्धेत. जगभरातील माजी दिग्गज खेळाडूं एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले असून सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. यावेळी भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंह हा देखील यंदाच्या हंगामात सामिल होणार आहे. लेजेंड्स लीग क्रिकेटच्या अधिकृत ट्वीटरवरुन ही माहिती देण्यात आली आहे.






हरभजन सिंहनं 1998 मध्ये पदार्पण केलं होतं आणि तो अखेरचा 2016 मध्ये निळ्या जर्सीत दिसला होता. त्यानं भारतीय संघासाठी 103 कसोटी सामने, 236 एकदिवसीय सामने आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 417 विकेट्स घेतल्या आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 269 विकेट्सची नोंद आहे. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यानं 25 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय हरभजन सिंहनं 2008 पासून आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली. त्यानं आयपीएलमध्ये एकूण 163 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्यानं एकूण 150 विकेट्स घेतले आहेत. नुकताच हरभजन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असून आता तो लेजेंड्स लीगमध्ये पुन्हा दिसणार आहे.


हे खेळाडूही होणार सामिल


काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या माहितीनुसार एस. श्रीसंत हा देखील या स्पर्धेत खेळणार आहे. तसंच यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल, फिरकीपटू प्रज्ञान ओझा, रतिंदर सोढी आणि अशोक डिंडा हे देखील यंदाच्या हंगामात सामिल होणार असून इरफान पठाण, युसूफ पठाण हे मागील हंगामापासून स्पर्धेत खेळत आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गन, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी गोलंदाज मिचेल जॉन्सन असे अनेक दिग्गज यंदा स्पर्धेत सामिल होताना दिसणार आहेत. 


हे देखील वाचा-