Happy 42nd Birthday MS Dhoni : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) अर्थात माहीचा आज वाढदिवस आहे. महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांची क्रेझ फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटपासून दुरावलेला धोनी आज त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेटच्या अनेक लोकप्रिय फॉरमॅटपासून तो दूर गेला असला, तरी त्याची इनिंग अजून संपलेली नाही. आज धोनी हे एक ब्रॅंड नाव झालं आहे.


660 कोटींहून अधिक मार्केट व्हॅल्यू 


जाहिरात विश्वातही महेंद्रसिंह धोनीचं नाव फार मोठं आहे. महेंद्रसिंह धोनी सध्या 35 हून अधिक ब्रँड्सची जाहिरात करतोय. मार्केटिंग एजन्सी डफ अँड फेल्प्सच्या मते, धोनी ब्रँडची मार्केट व्हॅल्यू सध्या 80.3 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 663 कोटी रुपये आहे. महेंद्रसिंह धोनीचे निवृत्तीनंतरही 'धोनी' या ब्रँडचे मूल्य वाढत आहे. एजन्सीच्या मते, जेव्हा धोनीने 2020 मध्ये निवृत्तीची घोषणा केली तेव्हा त्याची ब्रँड व्हॅल्यू $61.2 मिलियन होती. तेव्हा त्याच्याकडे 28 ब्रँड होते. त्यानंतर 2022 मध्ये, धोनीच्या ब्रँडची संख्या 36 पर्यंत वाढली.


'अशी' मिळाली धोनीच्या ब्रँडला ओळख 


महेंद्रसिंह धोनीला सोशल मीडियावर जवळपास 75 कोटींहून अधिक लोक फॉलो करतात. त्याची क्रेझ यंदाच्या आयपीएलमध्येही दिसून आली. महेंद्रसिंह धोनी जेव्हा मैदानात उतरला तेव्हा IPL चे डिजिटल ब्रॉडकास्ट प्लॅटफॉर्म Jio Cinema ने व्ह्यूअरशिपचा रेकॉर्ड केला होता. प्रतिस्पर्धी संघांच्या घरच्या मैदानावरही धोनीला जबरदस्त पाठिंबा मिळाला. लोकांमध्ये धोनीबद्दलची हीच क्रेझ त्याचा ब्रँड मोठा बनवते.


पोर्टफोलिओमध्ये 'या' नावांचा समावेश


सध्या महेंद्रसिंह धोनीच्या पोर्टफोलिओमध्ये ई-कॉमर्सपासून वित्तीय सेवा (Financial Services) आणि आरोग्यसेवा ते रिअल इस्टेटपर्यंतच्या ब्रँडचा समावेश आहे. 2005 मध्ये धोनी ब्रॅंडला पहिला ब्रेक मिळाला, तेव्हा त्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडची जाहिरात मिळाली. सध्या तो इंडिगो पेंट्स, मास्टरकार्ड, मॅट्रिमोनी डॉट कॉम, खत बुक, फायर बोल्ट, गरुड एरोस्पेस, कार्स 24 यांसह अनेक ब्रँडचा चेहरा आहे. धोनी खत बुक, गरुड एरोस्पेस, कार्स 24 यांसारख्या अनेक कंपन्यांमध्ये शेअरहोल्डर देखील आहे.


करदात्यांमध्येही सर्वात मोठं नाव 'MS Dhoni'


अनेक वर्षांपासून महेंद्रसिंह धोनी भारतातील सर्वात मोठ्या वैयक्तिक करदात्यांपैकी एक राहिला आहे. ट्रिब्यून इंडियाच्या ताज्या अहवालात आयकर विभागाच्या हवाल्याने असे सांगितले की महेंद्रसिंह धोनीने चालू मूल्यांकन वर्षात 38 कोटी रुपयांचा आगाऊ आयकर जमा केला आहे. त्यानुसार त्याची अंदाजे कमाई 130 कोटी रुपये इतकी आहे. याच्या वर्षभरापूर्वीही त्याने 38 कोटी रुपये आगाऊ कर जमा केले होते. तर, 2020-21 मध्ये त्याने 30 कोटी रुपये जमा केले होते. 


क्रीडा जगतातील सेलिब्रिटींपैकी जाहिरात-मार्केटिंगमधील काही प्रमुख चेहरे आहेत. यामध्ये महेंद्रसिंह धोनीशिवाय, क्रीडा जगतातील निवडक व्यक्तींमध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा. तसेच इतर प्रमुख चेहऱ्यांमध्ये पीव्ही सिंधू आणि नीरज चोप्रा यांसारख्या नावांचा समावेश आहे.