कोलंबो: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात पल्लेकलमध्ये तीन सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघ (Team India) श्रीलंकेत दाखल झाला असून सराव देखील सुरु करण्यात आला आहे. टीम इंडियाचंं नेतृत्त्व सूर्यकुमार यादव करणार आहे. मुख्य  प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी विचारविनिमय करुन भारतीय संघाची निवड केलेली आहे. गौतम गंभीर श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) दौऱ्यात एका डावखुऱ्या फलंदाजाला संधी देण्याच्या विचारात होता, अशी माहिती समोर आली आहे. त्या खेळाडूनं मुंबई इंडियन्सकडून खेळताना दमदार कामगिरी केलेली आहे. मात्र, एका गोष्टीमुळं रियान परागला (Riyan Parag)  संधी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. 


'टाइम्स ऑफ इंडिया'च्या एका बातमीनुसार मुंबई इंडियन्सचा खेळाडू तिलक वर्माला भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र, दुखापतीमुळं त्याचं नाव मागं पडलं. गौतम गंभीरचा कौल देखील तिलक वर्माच्या बाजूनं होता. मात्र, तिलक वर्मा (Tilka Varma) दुखापतग्रस्त असल्यानं गंभीरनं रियान परागला संधी दिली. रियान परागनं नुकत्याच झालेल्या झिम्बॉब्वे दौऱ्यात देखील खेळला होता. रियान पराग अष्टपैलू खेळाडू असून त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. त्यामुळं रियान परागला टी 20  आणि एकदिवसीय मालिकेत संघात स्थान दिलं गेलं आहे. रियान परागनं राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली होती.  


तिलक वर्मा दुखापतग्रस्त असल्यानं गौतम गंभीर आणि निवड समितीच्या सदस्यांना रियान पराग याचा पर्याय चांगला वाटला. रियान परागनं देखील त्याच्या खेळात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी देखील तो करु शकतो. रियान परागनं झिम्बॉब्वे दौऱ्यात भारतीय संघात पदार्पण केलं होतं. भारतासाठी त्यानं 3 मॅच खेळल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यानं 117  मॅच खेळल्या आहेत. त्यात 2640 धावा त्यानं केल्या असून 22 अर्धशतकं केली आहेत.  


तिलक वर्मा देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तिलक वर्मानं मुंबई इंडियन्सकडून खेळताना दमदार कामगिरी केलेली आहे. भारतीय संघाकडून एकदिवसीय आणि टी 20 सामने खेळले आहेत. तिलक वर्मानं भारतासाठी चार वनडे मॅच खेळल्या आहेत. याशिवाय 16 टी 20 मॅच खेळल्या असून त्यानं 336 धावा केल्या असून त्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे.  


टी 20 मालिकेचं वेळापत्रक


27 जुलै - 1ली टी-20 (पल्लेकेले)


28 जुलै - दुसरी टी-20 (पल्लेकेले)


30 जुलै - तिसरी टी-20 (पल्लेकेले)


एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक


2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)


4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)


7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो) 


संबंधित बातम्या: