Gautam Gambhir Ind Vs SA: गुवाहाटी येथील कसोटी सामन्यात बुधवारी टेम्बा बवुमाच्या नेतृत्त्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडिया अक्षरश: धूळ चारली. दक्षिण आफ्रिकेने (Ind Vs SA test) या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 408 धावांनी पराभव केला. हा भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात दारुण पराभव ठरला. टीम इंडियाचे कागदावर एकाहून एक मोठे वाटणारे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) गोलंदाजांसमोर टिकावच धरु शकले नाहीत. या पराभवामुळे टीम इंडियाच्या कसोटी क्रिकेटमधील मर्यादा उघड्या पडल्या आहेत. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला आहे. या पराभवाचे खापर आता भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्यावर फोडले जात आहे. गेल्या काही काळापासून गौतम गंभीरने विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारख्या कारकीर्दीच्या उतरणीला असलेल्या पण अनुभवी खेळाडूंना पूर्णपणे बाजूला ठेवून तरुण खेळाडूंचा संघ उभारण्याची मोहीम सुरु केली आहे. 2027 सालच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी तरुण खेळाडू संघात असणे आवश्यक आहे, अशी गौतम गंभीरची ठाम भूमिका आहे. याशिवाय, गौतम गंभीरकडून टीम इंडियातील (Team India) फलंदाजांबाबत सातत्याने वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत. प्रमुख फलंदाजांच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. हे अतिप्रयोगाचे धोरण टीम इंडियासाठी मारक ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे. गंभीरच्या या बेधडक निर्णयांमुळेच भारतीय संघाची घडी विस्कटल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे साहजिकच काल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर गौतम गंभीर याच्यावर माजी क्रिकेटपटू आणि क्रीडारसिकांनी टीकेची झोड उठवली आहे.
या पार्श्वभूमीवर काल सामना संपल्यानंतर भारतीय संघाची पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांनी गौतमी गंभीरला भारतीय संघाच्या अपयशावरुन काही बोचरे प्रश्न विचारले. तेव्हा गौतमी गंभीरने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत पत्रकारांना प्रत्युत्तर दिले. त्याने म्हटले की, 'लोक हे विसरतात की मी तो आहे, ज्याने इंग्लंडमध्ये भारताचा तरुण संघ असतानाही यश मिळवून दिलं. मात्र, या गोष्टी तुम्ही लवकरच विसरुन जाल. अनेकजण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेबाबत बोलत राहता. मात्र, मी तोच माणूस आहे ज्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने आशिया कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे', असे उत्तर गौतम गंभीर याने दिले.
आणखी वाचा