Gautam Gambhir rift with Rohit Sharma or Ajit Agarkar : 2024-25 च्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियामधील वादाच्या अनेक बातम्या समोर आल्या. गौतम गंभीरने कोचची जबाबदारी स्वीकारल्यापासून भारतीय संघाच्या कामगिरीत मोठी घसरण झाली आहे. यापूर्वी, रोहित अँड कंपनीला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर एका दशकानंतर भारताने बॉर्डर गावसकर ट्रॉफी गमावली. 


त्याशिवाय, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यात वाद सुरू असल्याचे बोलले जात होते. आता या सर्व अफवांवर बीसीसीआयकडून प्रतिक्रिया आली आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात मतभेद झाल्याच्या अफवा बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी फेटाळून लावल्या आहेत. 


राजीव शुक्ला काय म्हणाले?


"हे पूर्णपणे खोटे विधान आहे," असे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पीटीआयला सांगितले. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यातही कोणतेही मतभेद नाहीत. हे सर्व मूर्खपणाचे आहे जे माध्यमांमध्ये पसरवले जात आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माची बॅट पूर्णपणे शांत होती. त्यामुळे सततच्या अपयशानंतर त्याने सिडनी कसोटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर, त्याला कर्णधारपदावरून काढून टाकले जाऊ शकते अशा बातम्या आल्या. याबद्दल बोलताना राजीव शुक्ला म्हणाले, "रोहितने कर्णधारपदाचा आग्रह धरला आहे हे देखील चुकीचे आहे, तो कर्णधार आहे. फॉर्ममध्ये असणं किंवा नसणं हा क्रिकेटचा एक भाग आहे. जेव्हा त्याला कळले की तो फॉर्ममध्ये नाही, तेव्हा त्याने पाचव्या कसोटीतून स्वतःला बाहेर ठेवले.






बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणाले की, भारतीय संघाच्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी नुकतीच एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यांनी असेही स्पष्ट केले की चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाची घोषणा 18 किंवा 19 जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीनंतर केली जाईल.


हे ही वाचा -


India squad for Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सिलेक्शन कमिटीच टेन्शनमध्ये, 'या' खेळाडूंना संघात घ्यायचं का नाही? गोंधळाची परिस्थिती