World Cup : विश्वचषकाआधी प्रत्येक संघाचे दोन दोन सराव सामने आयोजित करण्यात आले होते. पण भारतीय संघाचे दोन्ही सराव सामने रद्द झाला. इंग्लंडविरोधात गुवाहाटी येथे होणारा सराव सामना रद्द झाला होता. तर नेदर्लंड्सविरोधातील Thiruvananthapuram येथील सराव सामनाही पावसामुळे रद्द झाला. भारतीय संघाने दोन सराव सामन्यासाठी तब्बल 6115 किमी इतका प्रवास केला. पण एकही चेंडू झाला नाही. गुवाहाटीच्या सामन्यात नाणेफेक झाली, पण सामना झाला नाही.
विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतीय संघाला अखेरची संधी होती. पण दोन्ही सराव सामने रद्द झाल्यामुळे टीम इंडियाच्या प्लॅनिंगवर पाणी फिरलेय. आता विश्वचषकाच्या रनसंग्रामाला अवघे काही तास शिल्लक आहेत. अक्षर पटेलच्या जागी भारतीय संघात अश्विनला संधी देण्यात आली आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघ चेन्नईला दाखल झाला आहे. चेन्नईमध्ये आठ ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना होणार आहे. या सामन्याद्वारे भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात करतील. भारतीय संघाला यंदाच्या विश्वचषकात विजयाचा दावेदार म्हटले जातेय.
वर्ल्ड कपसाठी भारतीय शिलेदार -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव
पाकिस्तानची कामगिरी -
दोन्ही सराव सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा धक्का बसला आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघाने पाकिस्तानच्या गोलंदाजांविरोधात 300 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडला आहे. पाकिस्तानची दमदार गोलंदाजी प्रभावहिन दिसली. सराव सामन्यात दोन्ही सामन्यात पराभव होणारा पाकिस्तान एकमेव संघ आहे.
चेन्नईत भारत-ऑस्ट्रेलियाचा आमना सामना -
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 8 ऑक्टोबरपासून आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करत आहेत. चेन्नईच्या मैदानावर दोन्ही संघामध्ये सलामीची लढत होणार आहे. त्यानंतर भारत 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरोधात दोन हात करेल. हा सामना दिल्लीमध्ये होणार आहे. अहमदाबादमध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांची लढत होणार आहे.
5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ -
5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.