Heath Streak Has Passed Away Aged 49: झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीक (Legendary Zimbabwe Cricketer Heath Streak Death) यांचं 22 ऑगस्ट रोजी वयाच्या 49 व्या वर्षी निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगानं ग्रस्त असलेल्या स्ट्रीकनं अखेर जगाचा निरोप घेतला. स्ट्रीकनं झिम्बाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामने खेळले आहेत. स्ट्रीक कोलन आणि लिव्हर कॅन्सरशी गेल्या बऱ्याच दिवसांपासून झुंज देत होता. त्याच्यावर दक्षिण आफ्रिकेत उपचार सुरू होते. अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली आणि त्यानं जगाचा निरोप घेतला. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळणाऱ्या हीथ स्ट्रीकच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 216 विकेट्स आहेत. यादरम्यान त्यानं 16 वेळा एका डावात 4 विकेट्स आणि 7 वेळा एका डावांत 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्येही हीथ स्ट्रीकची गोलंदाज म्हणून धमाकेदार कामगिरी पाहायला मिळाली आहे.


हीथ स्ट्रीकनं 50 ओव्हर्सच्या फॉर्मेटमध्ये 29.82 च्या सरासरीनं 239 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्यानं आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत एका डावांत 4 विकेट्स आणि एकदा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. हीथ स्ट्रीकच्या फलंदाजीची तर बातच न्यारी. हा अष्टपैलू खेळाडू मैदानात उतरला की, जणू वादळंच यायचं. आपल्या कारकीर्दीत स्ट्रिकनं कसोटी क्रिकेटमध्ये 1990 धावा केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमध्ये 2943 धावा रचल्या आहेत. स्ट्रीकनं कसोटी क्रिकेटमझ्ये 1 शतक आणि 11 अर्धशकतं झळकावली आहेत. यासोबतच त्याच्याकडे वनडेमध्ये 13 अर्धशतकांचा समावेश आहे. 


कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतरची कामगिरी 


2000 मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानं हीथ स्ट्रीकची कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही संघांचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली. स्ट्रीकच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेनं 21 पैकी 4 कसोटी सामने जिंकले तर 11 सामन्यात पराभव झाला, तर 6 सामने अनिर्णित राहिले. एकदिवसीय सामन्यांमध्ये, स्ट्रीकनं 68 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केलं आणि त्यापैकी 47 सामन्यांमध्ये झिम्बाब्वेला पराभवाचा सामना करावा लागला. तर संघानं 18 सामने जिंकले आहेत. स्ट्रीकच्या मृत्यूनंतर, अनेक आजी-माजी खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अनेकांनी ट्वीट करत त्याला श्रद्धांजलीही वाहिली आहे. टीम इंडियाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननंही ट्वीट कर स्ट्रीकला श्रद्धांजली वाहिली आहे. 


भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे आठ वर्षांचं निलंबन


झिम्बाब्वेच्या क्रिकेटच्या इतिहासात 100 विकेट्सचा टप्पा गाठणारा स्ट्रीक हा पहिलाच खेळाडू. क्रिकेटमधील निवृत्तीनंतर मात्र स्ट्रीक भ्रष्टाचार प्रकरणांमुळे अडचणीत आला होता आणि 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) त्याच्यावर आठ वर्षांची बंदी घातली होतं.


एकदिवसीय सामन्यांमध्ये स्ट्रीकने 2943 धावा केल्या आहेत. तर 239 विकेट्स घेतल्या आहेत. निवृत्तीनंतर त्यानं झिम्बाब्वेचं प्रशिक्षकपद स्वीकारलं होतं. त्यानंतर त्यानं आयपीएलमधील गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांसाठीही काम केलं आहे. स्ट्रीकनं आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेश आणि झिम्बाब्वेचं प्रशिक्षकपद भूषवलं आहे. 


स्ट्रीक हा झिम्बाब्वेसाठी खेळलेल्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने 1993 ते 2005 पर्यंत एकूण 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामने खेळले आहेत. पण स्ट्रीकची कॅन्सशी झुंज मात्र अपयशी ठरली आणि त्यानं जगाचा निरोप घेतला.