Ravi Shastri Wriddhiman Saha: टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाला देण्यात आलेले धमकीचे प्रकरण निवळण्याची चिन्हं नाहीत. या प्रकरणात टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी उडी घेतली आहे. साहाचे समर्थन करत त्यांनी सोमवारी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणीही शास्त्री यांनी केली.
काय म्हणाले रवी शास्त्री?
भारताचे माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी ट्वीट करून म्हटले की, 'भारतीय क्रिकेटपटूला अशाप्रकारे धमकावले जाणे हे अत्यंत धक्कादायक आहे. अशा प्रकारचा अपमान हा टीम इंडिया आणि त्याच्या क्रिकेटपटूंचा वारंवारपणे होत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी लक्ष दिले पाहिजे आणि या प्रकरणात कोण सहभागी आहेत, याचाही शोध घेतला पाहिजे. वृद्धीमान साहा यांनी सांगितलेली घटना गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रकरण काय आहे?
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियातून काही खेळाडूंना वगळण्यात आले आहे. यामध्ये यष्टिरक्षक वृद्धीमान साहा यांचा समावेश आहे. संघ निवडीनंतर त्याने एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी एका पत्रकारासोबतचे व्हॉट्सअॅप चॅट दाखवले. त्या स्क्रीनशॉटमध्ये एक पत्रकार साहाला मुलाखतीसाठी धमकावत असल्याचे दिसून आले. भारतीय क्रिकेटमधील माझ्या योगदानानंतर एका ‘प्रतिष्ठित’ पत्रकाराकडून मला अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतंय. पत्रकारिता इथेच संपते, असंही साहानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
अनुभवी खेळाडूंना कसोटी मालिकेतून वगळलं
वेस्ट इंडीजसह अखेरचा टी-20 सामना खेळल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेशी भिडणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्याची टी-20 मालिका आणि 2 सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. बीसीसीआयनं गुरुवारी श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानंतर काल भारतीय संघाची घोषणा केलीय. दरम्यान, वृद्धीमान साहासह भारताच्या अनुभवी खेळाडूंना श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आलंय.