पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू सईद अहमदचे वयाच्या 86 व्या वर्षी लाहोरमध्ये निधन झाले. बुधवारी दुपारी त्यांना रुग्णालयात नेले असता काही वेळातच सईदचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
सईदने 1958 ते 1973 दरम्यान 41 कसोटी सामने खेळले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 2991 धावा केल्या, ज्यात पाच कसोटी शतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याची तीन शतके भारताविरुद्ध होती. मात्र, पाकिस्तानने एकही कसोटी जिंकली नाही ज्यात सईदने शतक केले. सईद त्याच्या ऑफ स्पिनसाठीही प्रसिद्ध होता. ऑफस्पिनर म्हणून त्याने 22 कसोटी विकेट्सही घेतल्या. मात्र एका भांडणामुळे त्याची कारकीर्द संपुष्टात आली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वाद-
सईद त्याच्या कारकिर्दीतील बहुतांश काळ पाकिस्तान संघाचा प्रमुख खेळाडू होता, जरी त्याच्या कारकिर्दीचा शेवट अपमानास्पद झाला. पाकिस्तानच्या 1972 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात डेनिस लिली यांच्याशी झालेल्या वादानंतर, पाठीच्या दुखापतीचे कारण देत तिसऱ्या कसोटीतून त्याने माघार घेतली. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सईद खोटे बोलत असल्याचे सांगत त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली. त्यानंतर तो पुन्हा कधीही पाकिस्तानसाठी खेळला नाही आणि सईदची कारकीर्द संपुष्टात आली.
मोहसिन नक्वी यांनी व्यक्त केला शोक-
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी सईद अहमद यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.सईद अहमदच्या कुटुंबाप्रती तीव्र शोक व्यक्त करतो. याने मनापासून पाकिस्तानची सेवा केली आणि पीसीबी त्याच्या रेकॉर्डचा आणि कसोटी संघातील सेवांचा आदर करते, असं मोहसिन नक्की म्हणाले.
वयाच्या 20 व्या वर्षी पदार्पण-
सईदचा जन्म 1937 जालंधर येथे झाला. 1958 मध्ये ब्रिजटाऊन येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या प्रसिद्ध अनिर्णित कसोटीत सईदने वयाच्या 20 व्या वर्षी पदार्पण केले होते, जिथे हनिफ मोहम्मदने 970 मिनिटे फलंदाजी करून 337 धावा केल्या होत्या. सईदने तिसऱ्या विकेटसाठी मोहम्मदसोबत 154 धावांची भागीदारी केली, ज्यात त्याने 65 धावा केल्या होत्या.