Team India : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आज एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना तब्बल 10 विकेट्सनी जिंकल्यानंतर आज भारताला विजय मिळवून मालिकेती 2-0 ची विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यात कोण-कोणते खेळाडू मैदानात उतरणार हे पाहावे लागेल. पहिल्या सामन्यात भारताने कमाल कामगिरी केल्यामुळे शक्यतो भारत कोणताही बदल करण्याची शक्यता कमी आहे.


दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार विराट कोहलीनंतर दिग्गज खेळाडू जसप्रीत बुमराह देखील विश्रांती घेणार असल्याचं समोर आलं होतं. त्यात नुकताच वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 संघ जाहीर झाल्यानंतर यावेळीही बुमराह आणि कोहली संघात नसल्याने आजही बुमराह सामन्याला मुकला तर त्याच्या जागी युवा गोलंदाज अर्शदीपला संधी दिली जाऊ शकते. तर नेमकी भारताची अंतिम 11 कशी असू शकते, यावर एक नजर फिरवूया...


भारताची संभाव्य अंतिम 11


रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह/अर्शदीप सिंह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी 


मालिकेत भारताची आघाडी


इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं इंग्लंडच्या संघाला 25.2 षटकात 110 धावांवर रोखलं. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सहा आणि मोहम्मद शामीनं तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामीवीरांच्या 114 धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर 18.4 षटकातच सामना जिंकला. या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराह सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. या विजयामुळे भारत मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.


हे देखील वाचा-