England vs India 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथी कसोटी लंडनच्या ओव्हलमध्ये खेळली जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू त्यांच्या हातावर काळ्या फिती बांधून मैदानावर उतरले. तेव्हापासून प्रत्येकजण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की भारतीय खेळाडूंनी आज काळ्या फिती का घातल्या होत्या. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने याचे उत्तर दिले आहे.


भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक वासु परांजपे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी टीम इंडियाने काळ्या फिती बांधल्या आहेत. वासू यांचे सोमवारी 30 ऑगस्ट रोजी मुंबईत निधन झाले.






बीसीसीआयने भारतीय खेळाडूंचा फोटो शेअर करत म्हटलं की, ' टीम इंडिया महान क्रिकेटपटू वासु परांजपे यांना श्रद्धांजली देण्यासाठी हातावर काळी पट्टी बांधून उतरत आहे.' वासु परांजपे यांचे पुत्र जतिन परांजपे यांनी टीम इंडियाच्या या कृतीचं कौतुक करत आभार मानले. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, परांजपे कुटुंबीय या कृतीने खूप प्रभावित झाले आहे.


वासु परांजपे यांनी मुंबई आणि बडोदाचे प्रतिनिधित्व केले आणि 29 प्रथम श्रेणी सामने खेळले. ज्यात त्यांनी 785 धावा केल्या. पण नंतर ते प्रशिक्षक म्हणून खूप प्रसिद्ध झाले.