Ashes 2023, Edgbaston Test, England 2nd Inning : अॅशेस कसोटीतील पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडचा दुसरा डाव 273 धावांत आटोपला. पहिल्या डावात इंग्लंडकडे सात धावांची आघाडी होती. पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाला कसोटी जिंकण्यासाठी 281 धावांचे आव्हान मिळाले आहे. इंग्लंडचा दुसरा डाव झटपट आटोपला, एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. इंग्लंडकडून जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी प्रत्येकी 46-46 धावांचे योगदान दिले. त्याशिवाय कर्णधार बेन स्टोक्स याने 43 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या आहेत. जोश हेजलवूड आणि स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.


कांगारु धावांचा पाठलाग करणार का ?


पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 281 धावांची आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली आहे. आतापर्यंत एक विकेटच्या मोबदल्यात 70 धावांपर्यंत मजल मारली आहे. डेविड वॉर्नर 36 धावा काढून तंबूत परतलाय. पहिल्या डावात शतकी खेळी करणारा उस्मान ख्वाजा अद्याप मैदानावर आहे, त्याच्याकडून ऑस्ट्रेलियाला मोठ्या खेळीची आपेक्षा असेल. त्याशिवाय स्टिव स्मिथ आणि मार्नस लाबुशन यांच्या योगदानाकडे ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांचे लक्ष असेल. उस्मान ख्वाजा 23 तर मार्नस लाबुशेन 8 धावांवर खेळत आहेत. कसोटीच्या चौथ्या दिवसाचे अखेरचे सत्र सुरु आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 211 तर इंग्लंडला विजयासाठी 9 विकेटची गरज आहे. पहिल्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व दिसतेय. 






 पहिल्या कसोटीत आतापर्यंत काय झाले ?


अॅशेस कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान इंग्लंडने पहिल्या डावात आठ विकेटच्या मोबदल्यात 393 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून जो रुट याने शतकी खेळी केली. इंग्लंडने दिलेल्या 393 धावांच्या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने प्रभावीपणे केला. कागांरुंनी पहिल्या डावात 386 धावांपर्यंत मजल मारली. उस्मान ख्वाजा याने ऑस्ट्रेलियाकडून शतकी खेळी केली. त्याशइवाय ट्रेविस हेड आणि अॅलेक्स कॅरी यांनीही अर्धशतके झळकावली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 7 धावांनी पिछाडीवर होता. इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 273 धावांत संपला.