लंडन : इंग्लंडमधील साऊथविक अँड शोरहॅम क्रिकेट क्लबनं मोठा निर्णय घेतला आहे. या क्लबच्या मैदानावर खेळाडूंना षटकार मारण्यावर बंदी घातली आहे. या निर्णयामागं एक अजब कारण आहे. मैदानाजवळील नागरिकांनी त्यांच्या संपत्तीचं नुकसान होत असल्याची तक्रार केली होती. याशिवाय मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना दुखापत होण्याची आणि वाहनांच्या नुकसानाची संख्या देखील वाढली होती. यातून मार्ग काढण्यासाठी क्लबनं निर्णय घेतला आहे. 


क्लबनं या समस्येवर मार्ग काढण्यासाठी एक अजब नियम बनवला आहे. जेव्हा कोणताही खेळाडू पहिला षटकार मारेल त्यावेळी त्याला वॉर्निंग दिली जाईल. ज्या संघाच्या खेळाडूनं षटकार मारला आहे त्यांना धावा मिळणार नाहीत. यानंतर जे खेळाडू षटकार मारतील त्यांना बाद दिलं जाईल. 


साउथविक अँड शोरहॅम क्रिकेट क्लबचे खजिनदार मार्क ब्रोक्सअप यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. विमा दावे आणि कायदेशीर कार्यवाहीवर होणाऱ्या खर्चापासून वाचण्यासाठी हा नियम बनवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, जुन्या काळात क्रिकेट शांत वातावरणात खेळलं जायचं.  टी 20 आणि मर्यादित षटकांचं क्रिकेट सुरु झाल्यापासून या खेळात आक्रमकता आलेली आहे.  एका 80 वर्षीय व्यक्तीनं म्हटलं की आजकाल खेळाडूंमध्ये इतका उत्साह भरलाय की त्यांना षटकार मारण्यासाठी मैदान कमी पडत आहे. 


षटकार मारण्यावरील बंदी संदर्भातील या निर्णयामुळं खेळाडूंमध्ये संतापाचं वातावरण आहे. खेळाडूंनी या निर्णयाचा विरोध केला आहे. षटकार मारणं ही या खेळाची ओळख आहे. त्यावरच बंदी कशी घातली जाऊ शकते. यामुळं क्रिकेटमधील रोमांच कमी होईल. यामुळं खेळाडूंनी या नियमाचा विरोध केला आहे.  क्लब या निर्णयावर कायम राहणार की भूमिका बदलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


क्रिकेटमध्ये नवा प्रयोग 


साऊथविक अँड शोरहॅम क्रिकेट क्लबनं हा नवा प्रयोग सुरु केला आहे. या नियमाचा फायदा क्लबला होऊ शकतो. यामुळं क्लबला आर्थिक भूर्दंड कमी प्रमाणात बसेल. मात्र, क्रिकेटमध्ये षटकार मारण्यावर बंदी घातल्यास यातील रोमांच निघून जाऊ शकतो. नवा नियम लागू केल्यानं या मैदानावर क्रिकेट सामने खेळले जाणार की नियम रद्द होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या अजब नियमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.


संबंधित बातम्या : 


Suryakumar Yadav : यशस्वी- गिल डावाची सुरुवात करणार, रिंकू अन् दुबेवर फिनिशरची जबाबदारी, सूर्यकुमार यादवच्या ड्रीम टीममध्ये कुणाला संधी?


Ravindra Jadeja:रवींद्र जडेजाला श्रीलंका दौऱ्यात का संधी नाही? अजित आगरकरनं सगळं समजावून सांगितलं