मुंबई :  आगामी श्रीलंका (IND vs SL) दौऱ्यासाठी  भारतीय संघ जाहीर झाला आहे. तीन टी -20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा करण्यात आलेली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या तिघांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर टीम इंडियाची धुरा सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar  Yadav) देण्यात आलेली आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत रवींद्र जडेजा संधी न मिळाल्यानं तर्क वितर्क सुरु झाले होते. रवींद्र जडेजाला संघातून वगळण्यात आलं की काय अशा चर्चा सुरु होत्या. अखेर याबाबतचा प्रश्न निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar) यांना विचारण्यात आला,यावर त्यांनी महत्त्वाचं उत्तर दिलं. 


रवींद्र जडेजाला वगळलं की विश्रांती दिली?


श्रीलंकेत केवळ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. याचा संदर्भ देत अजित आगरकर यांनी तीन सामन्यांच्या मालिकेसाठी अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या दोघांना एकत्र संधी देण्याची गरज नाही. रवींद्र जडेजाला संघातून वगळण्यात आलेलं नाही. पुढील काळात आपल्यापुढं महत्त्वाच्या कसोटी मालिका आहेत. अजित आगरकर यांनी रवींद्र जडेजाला वगळण्यात आलं नसून त्याला आराम देण्यात आल्याचं म्हटलं.    



सूर्यकुमार यादवला कर्णधारपद कसं मिळालं? 


हार्दिक पांड्याचं नाव टी 20 कर्णधारपदाच्या शर्यतीत असताना सूर्यकुमार यादवला कशी संधी मिळाली याबाबत देखील विचारण्यात आलं. सूर्यकुमार यादव टी 20 मध्ये कर्णधारपदाचा दावेदार आहे. तो सर्वोत्तम खेळाडू आहे. मात्र, हार्दिक पांड्या आमच्यासाठी सर्वोत्तम खेळाडू आहे, असं अजित आगरकर म्हणाले. हार्दिक पांड्यानं संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र, हार्दिक पांड्याच्या फिटनेसचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. तो फिटनेस संदर्भातील समस्यांना सामोरा जात आहे. जे खेळाडू पूर्णवेळ उपलब्ध असतील, अशा खेळाडूंचा शोध घेत असल्याचं अजित आगरकर म्हणाले.  


आजच्या पत्रकार परिषदेतून सूर्यकुमार यादव केवळ आंतरराष्ट्रीय टी 20 मालिकेमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची इच्छा असल्यास त्यांना 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये संधी मिळू शकते, हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. मोहम्मद शमी हा बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन करेल, अशी माहिती देखील आजच्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे. 


संबंधित बातम्या :


शमी, गिल, सूर्यकुमार यादवपासून रोहित-कोहलीपर्यंत; गंभीरच्या पत्रकार परिषदेतील A टू Z माहिती

 

आमच्यात काय बोलणं झालं, कुठे बोलणं झालं...; विराट कोहलीवर प्रश्न विचारताच गंभीरचं रोखठोक उत्तर!