AUS vs ENG, Ashes 2023: ओव्हलच्या मैदानात अत्यंत थरारक झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 49 धावांनी पराभव केला आणि अॅशेस मालिकेत बरोबरी साधली. सामन्यात चौथ्या आणि आज पाचव्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे हा सामना ड्रॉ होईल आणि ऑस्ट्रेलिया 2-1  अशी मालिका जिंकेल असं वाटत होतं. पण, पाचव्या दिवशीच्या खेळात चहापानानंतर तीन बाद 264 वरुन इंग्लिश आर्मीच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 334 वर संपवला. स्ट्युअर्ट ब्रॉडने ऑसी विकेटकीपर अँलेक्स कॅरीला यष्टीपाठी झेलबाद केलं आणि कसोटी कारकीर्दीची यशस्वी सांगता केली. इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने चार तर मोईन अलीने तीन फलंदाज बाद केले. ब्रॉडने दोन तर वूडने एका फलंदाजाला तंबूत परतवलं. मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडलेल्या स्टोक्सच्या इंग्लिश आर्मीने मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधण्याचा पराक्रम गाजवलाय. गेल्या मालिकेत ऑस्ट्रेलिया विजयी झाल्यामुळे अॅशेस मात्र त्यांच्याकडेच राहणार आहेत.


डेविड वार्नर आणि उस्मान ख्वाजा यांची खेळी व्यर्थ 


ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे घसरला. डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजी यांनी जिगरबाज खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजायाच्या आशा उंचावल्या होत्या. सलामी फलंदाज उस्मान ख्वाजा याने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावांची खेळी केली. उस्मान ख्वाजा याने 145 चेंडूत 72 धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने आठ चौकार मारले. डेविड वॉर्नर याने 106 चेंडूत 60 धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने नऊ चौकार मारले. त्याशिवाय स्टिव स्मिथ याने 94 चेंडूत 54 धावांची खेळी केली, या खेळीत त्याने 9 चौकार मारले. ट्रेविस हेड याने 70 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. यांचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फ्लॉप गेले. 


इंग्लंडकडून ख्रिस वोक्स याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. वोक्स याने ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांना तंबूत धाडले. वोक्सशिवाय फिरकीपटू मोईन अली याने तीन विकेट घेतल्या. अखेरचा सामना खेळणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉड याने दोन विकेट घेतल्या. स्टुअर्ट ब्रॉड याने आपल्या करिअरमधील अखेरची विकेट ऑस्ट्रेलियाविरोधात घेतली. मार्क वूड याला एक विकेट मिळाली. 


सामन्यात आधी काय झालं ?


तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात 283 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 395 धावा केल्या. अशा प्रकारे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला 12 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडने दुसऱ्या डावात 395 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी 384 धावांचे लक्ष्य मिळाले. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात  रूटने सर्वाधिक धावा केल्या. रूटने 106 चेंडूत 91 धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने 103 चेंडूत 78 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार मारले. तर सलामीवीर जॅक क्रॉलीने 76 चेंडूत 73 धावा केल्या. या खेळाडूने आपल्या खेळीत 9 चौकार मारले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि टॉड मर्फीने 4-4 विकेट घेतल्या. तर वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड आणि कर्णधार पॅट कमिन्सने 1-1 विकेट घेतली.