IND vs IRE T20: विश्वचषकाआधी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी आहे.... वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे कमबॅक झालेय. होय... जवळपास वर्षभरानंतर जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. 25 सप्टेंबर 2022 रोजी जसप्रीत बुमराहने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याआधीही तो बरेच दिवस दुखापतग्रस्त होता. न्यूझीलंडमध्ये जसप्रीत बुमराहवर शस्त्रक्रियाही झाली होती. त्यानंतर आता बुमराहने टीम इंडियात कमबॅक केलेय. बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. तीन सामन्याच्या मालिकेसाठी युवा खेळाडूंची निवड केली आहे. सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात आलाय. या मालिकेतून जसप्रीत बुमराह टीम इंडियात कमबॅक करणार आहे. बुमरहाकडे कर्णधारपदाची जबाबदारीही सोपण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहशिवाय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याचेही कमबॅक झालेय.
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला टी20 विश्वचषक आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप स्पर्धेत फटका बसला होता. बुमराहची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. आता जसप्रीत बुमराह टीम इंडियात परतलाय. आशिया चषक आणि भारतात होणाऱ्या विश्वचषकाआधी भारतीय संघासाठी ही दिलासादायक बातमी आहे. जसप्रीत बुमराह आयर्लंड दौऱ्यात कशी कामगिरी करतो ? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेय. जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी विश्वचषकाआधी भारतीय संघात कमबॅक केलेय. पण केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. त्यांच्या फिटनेसबाबातही बीसीसीआयकडून अपडेट देण्यात आले नाही.
राहुल-अय्यरची प्रतीक्षाच -
आयर्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा या दोन खेळाडूंचं दुखापतीनंतर पुनरागमन होत आहे. पण दोन महत्वाच्या खेळाडूंची अद्याप प्रतीक्षाच करावी लागणार आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांची आयर्लंड दौऱ्यासाठी निवड झालेली नाही. त्यामुळे केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. हे दोन्ही खेळाडू आशिया चषक आणि वर्ल्डकपसाठी उपलब्ध असतील की नाही, याबाबत बीसीसीआयकडून सध्या कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही.
सिनिअर खेळाडूंना आराम -
18 ऑगस्टपासून आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दुसरा ट्वेंटी-ट्वेंटी सामना 20 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यात सर्व मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जडेजा, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, सिराज हे मोठे खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.
युवा खेळाडूंना संधी -
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल आणि जितेश शर्मा यांना चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळाले आहे. या खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान मिळाले आहे. त्याशिवाय मुकेश कुमार आणि शाहबाज अहमद, शिवम दुबे यांनाही संधी देण्यात आली आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ कसा आहे ?
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आवेश खान.