ENG vs WI Ben Stokes: इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (England vs West Indies) यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना एजबॅस्टन येथे खेळला गेला. हा सामना इंग्लंडने 10 विकेट्सने जिंकत मालिकाही 3-0 अशा फरकाने जिंकली. 






वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने तिसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 282 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून कर्णधार ब्रॅथवेटने सर्वाधिक 61 धावा केल्या. जेसन होल्डरने 59 आणि जोशुआ डी सिल्वाने 49 धावा केल्या. इंग्लंडकडून गस ऍटकिन्सनने सर्वाधिक 4 बळी घेतले.


इंग्लंडच्या पहिल्या डावात 376 धावा-


वेस्ट इंडिजने 282 धावा केल्यानंतर इंग्लंडने प्रत्युत्तरात 376 धावा केल्या. इंग्लंडकडून जेमी स्मिथने सर्वाधिक 95 धावा केल्या. जो रूटने 87 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार बेन स्टोक्सने 54 धावा केल्या. ख्रिस वोक्सनेही 62 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.


दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ 175 धावांत सर्वबाद-


दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ 175 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे वेस्ट इंडिज इंग्लंडला केवळ 87 धावांचे लक्ष्य देऊ शकले. वेस्ट इंडिजकडून मायकेल लुईसने 57 आणि कावेम हॉजने 55 धावा केल्या.


इंग्लंडने हा सामना 10 गडी राखून जिंकला-


87 धावांचे लक्ष्य इंग्लंडने तिसऱ्या दिवशी एकही विकेट न गमावता 7.2 षटकांत पार केले. संघासाठी कर्णधार बेन स्टोक्स सलामीला आला आणि त्याने 28 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 57 धावांची खेळी केली. तर बेन डकेट 26 धावा करून नाबाद परतला.


बेन स्टोकचा भीमपराक्रम-


स्टोक्सने इंग्लंडसाठी कसोटीतील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. स्टोक्सने अवघ्या 24 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. याआधी इंग्लंडकडून कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम इयान बॉथमच्या नावावर होता. त्याने 1981 मध्ये दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारताविरुद्ध 28 चेंडूत अर्धशतक केले होते. आता बेन स्टोक्सने त्याचा 43 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला.






कसोटीतील सर्वात वेगवान अर्धशतक-


21 चेंडू - मिसबाह-उल-हक (पाक) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अबू धाबी, 2014
23 चेंडू - डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध पाकिस्तान, सिडनी, 2017
24 चेंडू - जॅक कॅलिस (एसए) विरुद्ध झिम्बाब्वे, केप टाऊन, 2005
24 चेंडू - बेन स्टोक्स (इंग्लंड) विरुद्ध वेस्ट इंडिज, एजबॅस्टन, 2024
25 चेंडू - शेन शिलिंगफोर्ड (वेस्ट इंडीज) विरुद्ध न्यूझीलंड, किंग्स्टन, 2014.


संबंधित बातमी:


'मला कर्णधार व्हायचं नाही...'; श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर सूर्यकुमार यादव काय बोलून गेला?