ENG vs NZ Test : वेलिंग्टन येथे नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यातील कसोटी सामन्यात कसोटी क्रिकेटमधील एक अप्रतिम लढत पाहायला मिळाली. एक रोमहर्षक विजय काय असतो हे न्यूझीलंडने दाखवून दिलं. सर्वात आधी फॉलोऑन मिळूनही 258 धावाचं तगडं लक्ष्य किवी संघानं इंग्लंडला दिलं. ज्यानंतर अवघ्या एका धावेच्या फरकाने सामना जिंकून न्यूझीलंडने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. फॉलोऑन मिळाल्यानंतरही सामना जिंकणारा न्यूझीलंड हा तिसराच जगातील संघ ठरला आहे. याआधी इंग्लंड आणि भारताने ही कामगिरी केली आहे.


सामन्यात आधी इंग्लंडने पहिल्या डावात 435 धावा करुन किवी संघाला 209 धावांत सर्वबाद करत 226 धावांची विशाल आघाडी घेतली. ज्यानंतर न्यूझीलंडने फॉलोऑन खेळताना जोरदार पुनरागमन केलं आणि दुसऱ्या डावात 483 धावा करत इंग्लंडला विजयासाठी 258 धावांचं लक्ष्य दिलं. शेवटच्या डावात इंग्लंडला 256 धावांवर सर्वबाद करत न्यूझीलंडने सामना जिंकला. नील वॅगेनरने अखेरची विकेट घेत विजयात मोलाची कामगिरी बजावली. या विजयामुळे दोन्ही देशांदरम्यान खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. वेलिंग्टन कसोटीची खास गोष्ट म्हणजे न्यूझीलंडने फॉलऑन खेळूनही इंग्लंडला पराभूत केलं.






वॅगनरसमोर रुटची झुंज व्यर्थ


पहिल्या डावात नाबाद 153 धावांची खेळी करणाऱ्या जो रुटने दुसऱ्या डावातही शानदार फलंदाजी करण्यात यश मिळवले. यादरम्यान त्याने कर्णधार बेन स्टोक्ससोबत सहाव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या डावात त्याने 95 धावा केल्या. एकवेळ अशी होती की इंग्लंडचा संघ दुसरी कसोटी सहज जिंकेल असे वाटत होते. पण वॅगनरने जो रुट आणि बेन स्टोक्सला बाद करुन न्यूझीलंडला विजयाजवळ नेलं. यानंतर बेन फॉक्सला टीम साऊदीने बाद केलं. यानंतर स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच यांनी न्यूझीलंडकडून सामना हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण ते दोघेही बाद झाले. शेवटच्या क्षणांमध्ये जेम्स अँडरसनने चौकार मारुन न्यूझीलंडच्या हृदयाची धडधड वाढवली होती. पण विजयासाठी अजून एक धाव बाकी असताना वॅगनरने अँडरसनला बाद करत आपल्या संघाला एका धावेच्या फरकाने विजय मिळवून दिला.





सामन्याचा लेखा-जोखा


या कसोटीच्या पहिल्या दोन दिवसात जिथे इंग्लंडचा संघ एकतर्फी वर्चस्व गाजवत होता, तिथे किवी संघाने पुढील दोन दिवस वर्चस्व गाजवलं. एकीकडे पहिल्या डावात 435 धावा करुन इंग्लंडने किवी संघाला 209 धावांत सर्वबाद करत 226 धावांची विशाल आघाडी घेतली. पण न्यूझीलंडने फॉलोऑन खेळताना जोरदार पुनरागमन केलं आणि दुसऱ्या डावात 483 धावा करत इंग्लंडला विजयासाठी 258 धावांचं लक्ष्य दिलं. ज्यानंतर 256 धावांत इंग्लंड सर्वबाद झाला. संपूर्ण सामन्याचा विचार करता सर्वात आधी नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने गोलंदाजी निवडली. पण इंग्लंडने जबरदस्त फलंदाजी करत आपला पहिला डाव 8 गडी गमावून 435 धावांवर घोषित केला. यावेळी हॅरी ब्रूकने 183 तर जो रुटने नाबाद 156 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 138 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या. किवी संघ 297 धावांनी पिछाडीवर होता. यानंतर तिसऱ्या दिवशी किवी संघाच्या अखेरच्या फळीतील फलंदाजांनी आपल्या संघाला 209 धावांपर्यंत नेलं. ज्यानंतर पहिल्या डावात 226 धावांनी पिछाडीवर पडल्यामुळे इंग्लंडने किवी संघाला फॉलोऑन दिला. त्यानंतर फॉलोऑन खेळताना किवी फलंदाजांनी चांगली झुंज देत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 गडी गमावून 202 धावा केल्या. यानंतर काल (27 फेब्रुवारी) सामन्याच्या चौथ्या दिवशी किवी फलंदाजांनी दमदार खेळ दाखवला. केन विल्यमसन (132 धावा), टॉम ब्लंडेल (90 धावा), डॅरिल मिशेल (54 धावा) यांच्या खेळीमुळे किवी संघाने दुसऱ्या डावात 483 धावा केल्या. यावेळी इंग्लंडचा फिरकी गोलंदाज जॅक लीचने 5 बळी घेतले. अशाप्रकारे इंग्लंडला 258 धावांचे लक्ष्य मिळाले. हे लक्ष्य पार करताना जो रुट आणि बेन स्टोक्सने चांगली झुंज दिली. पण नील वॅगनरच्या 4 महत्त्वाच्या विकेट्समुळे सामना न्यूझीलंडने जिंकला.


हे देखील वाचा-