Kane Williamson Record : न्यूझीलंडचा माजी फलंदाज केन विल्यमसनने (Kane Williamson) वेलिंग्टन येथे खेळवल्या जात असलेल्या कसोटीत शतक झळकावून एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आता तो न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने माजी क्रिकेटपटू रॉस टेलरला (Ross Taylor) मागे टाकलं आहे.
विशेष म्हणजे केन विल्यमसनने अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी हा खास विक्रम केला आहे. त्याची खेळी अशा वेळी आली जेव्हा इंग्लंडला वेलिंग्टन कसोटीत पहिल्या डावाच्या जोरावर 226 धावांची मोठी आघाडी मिळाली होती. अशा स्थितीत इंग्लंडने न्यूझीलंडला फॉलोऑन दिला, पण किवी संघाच्या आघाडीच्या फळीतील दमदार फलंदाजीमुळे न्यूझीलंडने सामन्यात पुनरागमन केलं. आधी टॉम लॅथमने (83 धावा) आणि डेव्हॉन कॉनवेने (61 धावा) करत शानदार अर्धशतकं झळकावली आणि त्यानंतर केन विल्यमसनने शतक झळकावून संघाला 450 धावांच्या पुढे नेलं. 282 चेंडूत 132 धावांची खेळी केल्यानंतर विल्यमसन बाद झाला. टॉम ब्लंडलनेही 95 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. किवी फलंदाजांच्या या पलटवारामुळे आता ही कसोटी जिंकण्यासाठी इंग्लंडला 258 धावांचे लक्ष्य मिळालं आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये सुरु या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता.
केन विल्यमसनचा कसोटी रेकॉर्ड
केन विल्यमसनने आतापर्यंत 92 कसोटी सामने खेळले आहेत. येथे त्याने 161 डावांमध्ये 53.33 च्या सरासरीने 7787 धावा केल्या आहेत. तो रॉस टेलरच्या कसोटी धावांच्या रेकॉर्डच्या (7683) पुढे गेला आहे. विल्यमसनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 26 शतकं झळकावली आहेत. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक कसोटी शतकं करणारा ही तोच आहे. विल्यमसन फक्त 32 वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात त्याने ही लय कायम राखली आणि 5 ते 6 वर्षे क्रिकेट खेळत राहिल्यास इतर अनेक मोठे विक्रमही त्याच्या नावावर होऊ शकतात.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना रंगतदार स्थितीत
वेलिंग्टन येथे सुरु या इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यातील कसोटी सामना अगदी रोमांचक वळणावर पोहोचला आहे. या कसोटीच्या पहिल्या दोन दिवसात जिथे इंग्लंडचा संघ एकतर्फी वर्चस्व गाजवत होता, तिथे किवी संघाने पुढचे दोन दिवस वर्चस्व गाजवलं. पहिल्या डावाच्या आधारे 226 धावांच्या मोठ्या फरकाने पिछाडीवर असतानाही न्यूझीलंडने फॉलोऑन खेळताना जोरदार पुनरागमन केलं आणि दुसऱ्या डावात 483 धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी 258 धावांचे लक्ष्य दिले आहे.
हे देखील वाचा-