Eng vs Ind Test match: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला लीडस येथील हेडिंग्ले मैदानात शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या कसोटी सामन्याचा प्रारंभीचा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. कसोटीच्या पहिल्या दिवसावर पूर्णपणे भारतीय संघाचे वर्चस्व राहिले. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल यांचे शतक आणि उपकर्णधार ऋषभ पंत याचे अर्धशतक हे पहिल्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला साई सुदर्शन या सामन्यात भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी 91 धावांची भागीदारी केली. पण, त्यानंतर संघाला दोन धक्के बसले. त्यानंतर केएल राहुलही बाद झाला. दोन विकेट पडल्यानंतर, कर्णधार गिल आणि यशस्वी यांनी डावाची सूत्रे हाती घेतली आणि 129 धावांची भागीदारी केली.

Continues below advertisement


यशस्वी जैस्वाल याने शानदार शतक झळकावत भारतीय संघाला भक्कम स्थितीत नेऊन ठेवले. त्याने 101 धावा केल्या. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 3 बाद 359 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाच्या शेवटी ऋषभ पंत (65*) आणि शुभमन गिल (127*) हे दोघे नाबाद राहिले. ते आज पुन्हा भारतीय संघाचा डाव सुरु करतील




Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल अन् शुभमन गिलमधील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल


कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी शतकी भागीदारी करुन भारतीय संघाचा डाव सावरला. हे दोघे बराच काळ खेळपट्टीवर ठाण मांडून होते. यादरम्यान दोघांमध्ये अधुनमधून संभाषण सुरु होते. यापैकी एका संभाषणाची क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कर्णधार शुभमन गिल हा यशस्वी जैस्वाल याला बहुधा सांभाळून खेळण्याचा सल्ला देत आहे. यशस्वी जैस्वाल प्रत्येक चेंडू टोलावल्यानंतर लगेच धाव घेण्यासाठी क्रीझमधून बाहेर निघत होता. त्यामुळे जैस्वाल रनआऊट होण्याचा धोका होता. यावर शुभमन गिलने त्याला सांभाळून खेळण्याचा सल्ला दिला. त्यावर जैस्वाल याने म्हटले की, 'धावायचं की नाही, हे मला फक्त सांगत राहा. मला क्रीझ सोडून पुढे येण्याची सवय आहे. मला जोरात ओरडून सांगा, नको धावू.' त्यावर गिलने जैस्वालला सांगितले की, तू फक्त धावत सुटू नकोस. यानंतर काहीवेळाने जैस्वाल असाच एक चेंडू मारुन धाव  घेण्यासाठी धावत सुटला. तो बऱ्यापैकी पुढेही आला होता. तेव्हा शुभमन गिलने त्याला परत जा, असे ओरडून सांगितले. त्यावर जैस्वालने काहीसे वैतागून, 'अरे यार भय्या, आ जाओ यार', असे म्हटले. शुभमन गिलने सांगितले की, इंग्लंडचा क्षेत्ररक्षक बॉलपासून जवळ होता. त्यावर जैस्वाल म्हणाला, क्षेत्ररक्षक खूप दूर होता. यावर शुभमन गिलने मोठ्या मनाने जैस्वालची माफीही मागितली.



आणखी वाचा


कर्णधार गिलचा पहिलाच 'हिट शो', कसोटी कॅप्टनसी डेब्यू अन् थेट ठोकले शतक, इंग्लंडसह जगही अवाक्