नवी दिल्ली : ईडीने बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग साइटशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या एकूण 11.14 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या प्राथमिक आदेशानुसार, प्रतिबंधक मनी लॉन्ड्रिंग कायदा (PMLA) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. यात शिखर धवन यांची 4.5 कोटी रुपयांची मालमत्ता आणि सुरेश रैना यांच्या 6.64 कोटी रुपयांच्या म्युच्युअल फंडची जप्ती करण्यात आली आहे.

Continues below advertisement


काय आहे प्रकरण?


ईडीची ही चौकशी विविध राज्यांच्या पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित आहे. हे प्रकरण बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म  1xBet शी संबंधित आहे. ईडीच्या तपासात असे आढळले आहे की, दोन्ही माजी क्रिकेटपटूंनी जाणूनबुजून परदेशी कंपन्यांशी करार करून 1xBet आणि त्याच्याशी संबंधित अन्य साइट्सच्या जाहिराती केल्या होत्या. ईडीच्या मते, रैना आणि धवन यांनी परदेशी कंपन्यांसोबत मिळून या प्लॅटफॉर्म्सच्या जाहिराती केल्या आणि त्याबदल्यात त्यांना परदेशातून पैसे मिळाले. हे पैसे बेकायदेशीर सट्टेबाजीमधून मिळालेले होते, आणि त्यांचा खरा स्रोत लपवण्यासाठी गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार करण्यात आले.






चौकशीत काय उघड झाले?


1xBet भारतात हजारो बनावट (म्यूल अकाउंट) बँक खात्यांद्वारे व्यवहार करत होते. आतापर्यंत 6000 पेक्षा जास्त बनावट खाती उघडकीस आली आहेत. या खात्यांमधून सट्टेबाजीतील रक्कमेचा प्रवाह विविध पेमेंट गेटवेमधून वळवून मूळ स्रोत लपवला गेला. अनेक पेमेंट गेटवे KYC तपासणी न करता व्यापाऱ्यांना जोडत होते. एकूण मनी लॉन्ड्रिंगचा मागोवा (trail) ₹1000 कोटींपेक्षा जास्त असल्याचे आढळले आहे.


ED ची कारवाई


ईडीने या प्रकरणात चार पेमेंट गेटवेवर छापे टाकले आणि 60 हून अधिक बँक खात्यांना गोठवले (freeze) आहे. आतापर्यंत ₹4 कोटींपेक्षा जास्त रक्कम फ्रीझ करण्यात आली आहे. ईडीने जनतेला सावधगिरीचा इशारा दिला आहे की, कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन सट्टेबाजी, जुगाराच्या प्रचारात किंवा गुंतवणुकीत सहभागी होऊ नका. संस्था म्हणते की अशा बेकायदेशीर क्रिया केवळ आर्थिक नुकसानच घडवत नाहीत, तर मनी लॉन्ड्रिंग आणि इतर गुन्हेगारी क्रियांनाही प्रोत्साहन देतात. लोकांनी कोणतीही संशयास्पद ऑनलाइन जाहिरात किंवा आर्थिक व्यवहार आढळल्यास तत्काळ स्थानिक पोलिसांना किंवा ईडीला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


हे ही वाचा -


T20 World Cup 2026 Venue's Update : नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना; पण भारत-पाक सामना कुठे?, 'या' 5 शहरात रंगणार टी-20 वर्ल्डकप 2026 चा 'महासंग्राम'