IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पंजाबपासून ते मुंबईपर्यंत सर्वाच दहा संघांनी आपली तयारी सुरु केली आहे. खेळाडूही मैदानावर घाम गाळत आहेत. पंजाबचा कर्णधार शिखर धवन यानेही आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कंबर कसली आहे. दोन महिने चालणाऱ्या स्पर्धेसाठी खेळाडू जिवाचं रान करतील. आयपीएल स्पर्धेआधी शिखर धवन भन्नाट फॉर्मात आला आहे. शिखर धवन यानं 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 99 धावांची खेळी केली. शिखर धवन आयपीएलमध्ये पंजाब संघाची धुरा संभाळतोय. शिखर धवन फॉर्मात आल्यामुळे पंजाबसाठी आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जमेची बाजू ठरेल.
DY Patil टी20 स्पर्धेमध्ये शिखर धवन यानं शानदार कामगिरी केली. शिखर धवन यानं विस्फोटक फलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. आयपीएलआधी धवन फुल ऑन फॉर्मात आलाय. DY Patil ब्लू संघाकडून खेळताना शिखर धवन यानं नाबाद 99 धावांची खेळी केली. धवन यानं 194 च्या स्ट्राईक रेटनं धावांचा पाऊस पाडला. त्यानं 51 चेंडूमध्ये आठ चौकार आणि सहा षटकारांचा पाऊस पाडला.
शिखर धवनच्या विस्फोटक खेळीच्या बळावर DY Patil ब्लू संघाने 20 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 182 धावांचा डोंगर उभारला. पण प्रतिस्पर्धी संघाने या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. CAG संघाने 20 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चार विकेटच्या मोबदल्यात या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.
आयपीएल 2023 मध्ये धवनची कामगिरी कशी राहिली ?
2022 पासून शिखर धवन पंजाब किंग्स संघाचा सदस्य आहे. गेल्या हंगामात शिखर धवन याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. 2023 मध्ये शिखर धवन यानं पंजाबसाठी 41 च्या सरासरीने 373 धावा चोपल्या. यादरम्यान तीन अर्धसतके ठोकली. धवनच्या नेतृत्वात पंजाबला प्लेऑफमध्ये स्थान पटकावता आले नाही. शिखर धवन यानं आयपीएलचे 2017 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 6616 धावा केल्यात, त्यामध्ये 50 अर्धशतकं आणि दोन शतकांचा समावेश आहे.