Gautam Gambhir on Dinesh Karthik: भारताचा फलंदाज आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनं आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत भारतीय संघात स्थान मिळवलं. दरम्यान, आयपीएलमधील दिनेश कार्तिकच्या आयपीएलमधील कामगिरीचं अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी कौतूक केलं होतं. बंगळुरूच्या संघात फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या दिनेश कार्तिकला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात संघात स्थान मिळणार की नाही? यावर चर्चा सुरू आहे. यातच भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीनं दिनेश कार्तिकबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. टी-20 विश्वचषकासाठी दिनेश कार्तिक फिट नसल्याचं त्यानं म्हटलंय. गंभीरच्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. 


स्टार स्पोर्ट्सच्या मॅच पॉईंट शो मध्ये गौतम गंभीर म्हणाला की, "भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात दिनेश कार्तिक मौल्यवान 30 धावांची खेळी केली. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून तो आरसीबीसाठी हे करत आहे. तो फलंदाजी क्रमात अक्षर पटेलच्या आधी आला असता तर मला आवडलं असतं." परंतु, गंभीरला टी-20  विश्वचषक 2022 साठी संघात दिनेश कार्तिकच्या निवडीबद्दल विचारण्यात आलं असता तो म्हणाला की, याबाबत आता भाष्य करणं अयोग्य ठरेल. आगामी टी-20 विश्वचषकाला अजून काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. तोपर्यंत त्याला चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल.  पण त्याला शेवटच्या तीन षटकांतच फलंदाजी करायची असेल, तर परिस्थिती खूप कठीण होईल. भारताला अव्वल सातमध्ये असा खेळाडू नक्कीच आवडेल, जो गोलंदाजीही करू शकेल आणि अशा परिस्थितीत अक्षर पटेल हा एक चांगला पर्याय ठरतो.


...तर दिनेश कार्तिकला संघात समाविष्ट करण्यात अर्थ नाही
गंभीर पुढे म्हणाला,"मी दिनेश कार्तिकला माझ्या संघात ठेवणार नाही. आमच्याकडं ऋषभ पंत, दीपक हुडा असे खेळाडू आहेत. त्यानंतर केएल राहुलचं पुनरागमन होईल, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा हे सर्व संघात परतल्यावर दिनेश कार्तिकला आपलं स्थान टिकवणं कठीण होईल. जर तुम्हाला त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये  जागा मिळू शकत नाही, तर त्याला संघात समाविष्ट करण्यात काही अर्थ नाही"


हे देखील वाचा-