ENG vs NZ: इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो पाठोपाठ विक्रमांचं शिखर गाठत आहे. नॉटिंगहॅम कसोटी सामन्यात नुकतंच त्यानं भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. हा पराक्रम करून काही तास उलटले नाहीत, तोच त्यानं भारताचा माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचा विक्रम मोडलाय. जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तेरावा क्रिकेटपटू ठरलाय. 


युनिस खान, सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडला
न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत जो रूटनं कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठला. दोन सामन्यांत दोन शतके झळकावत जो रूटनं आता युनूस खाननंतर सुनील गावस्करला मागं टाकलं आहे. सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार 122 धावा केल्या. रुट 10 हजार 191 धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तेराव्या स्थानावर पोहचलाय. या यादीत युनूस खान 10 हजार 99 धावांसह पंधराव्या स्थानावर आहे. 


लवकरच मोडणार स्टीव्ह वॉचं रेकार्ड 
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिननं त्याच्या कसोटी कारकिर्दीत 15 हजार 921 धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंग आहे. ज्यानं 13 हजार 378 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस 13 हजार 289 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. महत्वाचं म्हणजे, स्टीव्ह वॉच्या नावावर 10 हजार 927 धावांची नोंद आहे. सध्या जो रूट ज्या फॉर्ममध्ये दिसत आहे. हे पाहता तो लवकरच स्टीव्ह वॉचा विक्रम मोडेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. 


विराट कोहली- स्टीव्ह स्मिथच्या विक्रमाशी बरोबरी
कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथनं यांनी आतापर्यंत 27 शतक झळकावली आहेत.  महत्वाचं म्हणजे, विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटचं शतक झळकावलं होतं. तर, स्टीव्ह स्मिथनं जानेवारी 2021 मध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचं शतक ठोकलं. विशेष म्हणजे, इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटनं गेल्या 18 महिन्यांत 10 शतक झळकावली आहेत. रुटनं गेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये चार शतक ठोकली आहेत. 


कसोटीत 10 हजारांचा टप्पा गाठणारा दुसरा इंग्लंडचा खेळाडू
न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जो रूटनं कसोटी कारकिर्दीतील 10 हजार धावांचा टप्पा गाठला होता.  जो रूट आगामी काळात महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडू शकतो, असा अनेक दिग्गजांचा विश्वास आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 200 कसोटी सामन्यांमध्ये 15921 धावा आहेत. जो रूट अवघ्या 31 वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत हा इंग्लिश फलंदाज सचिन तेंडुलकरचा कसोटी धावांचा विक्रम मोडू शकतो, असं मानलं जात आहे. आता येत्या काळात जो रूटचा फॉर्म कसा असेल? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.


हे देखील वाचा-