MS Dhoni Annual Income : एम.एस. धोनीच्या निवृत्तीला साधारण दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी धोनीच्या कमाईवर कोणताही परिणाम झालेला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत धोनीच्या कमाईत 30 टक्केंची वाढ झाल्याचं समोर आले आहे. आयकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, धोनीने 2021-22 या वर्षासाठी 38 कोटी रुपयांचा अग्रीम कर जमा केला आहे. गतवर्षी म्हणजेच 2020-21 या आर्थिक वर्षात धोनीने 30 कोटी रुपयांचा कर जमा केला होता. धोनीच्या कमाईत जवळपास 30 टक्केंची वाढ झाली आहे. आयकर विभागाच्या सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, एम. एस. धोनी  यंदाच्या वर्षी झारखंडमधील सर्वाधिक वैयक्तिक कर भरणारा करदाता आहे. 


तज्ज्ञांच्या मते, धोनीने जमा केलेल्या 30 कोटी रुपयांच्या अग्रीम कराच्या आधारावर आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये धोनीची कमाई 130 कोटींच्या आसपास असेल.  आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धोनीने जेव्हापासून आतंरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून तो झारखंडमधील सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये धोनीने 28 कोटी रुपयांचा कर भरला होता. तर त्याआधी 2018-19 मध्येही धोनीने 28 कोटींचा कर भरला होता. 2017-18 मध्ये धोनीने 12.17 कोटी आणि 2016-17 मध्ये धोनीने 10.93 कोटींचा कर भरला होता. 


 एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2022 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर धोनीने बिझनेसच्या मैदानावरुन दणक्यात कमाई केली आहे. धोनी आयपीएलमध्ये अद्याप खेळत आहे. माजी कर्णधार धोनीने अनेक कंपन्यामध्ये गुंतवणूक केली आहे. स्पोर्ट्स वेअर, होम इंटीरिअरची कंपनी होमलेन, जुन्या गाड्या खरेदी-विक्री करणारी कंपनी कार्स 24, स्टार्टअप कंपनी खाताबुक, स्पोर्ट्स कंपनी रन एडम, क्रिकेट कोचिंग आणि ऑर्गेनिक शेतीमध्येही धोनीने गुंतवणूक केली आहे. धोनी रांचीमध्ये जवळपास 43 एकरमध्ये ऑर्गेनिक शेती करत आहे.