CWC Qualifiers 2023: भारतात खेळवण्यात येणाऱ्या विश्वचषकासाठी (WorldCup) नेदरलँड्स हा संघ पात्र ठरला आहे. विश्वचषकासाठी पात्र ठरणारा नेदरलँड्स हा 10 वा संघ आहे. नेदरलँड्सने विश्वचषक पात्रता फेरीच्या सुपर-6 मध्ये स्कॉटलंडचा पराभव करत विश्वचषकाच्या स्पर्धेमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या सामन्यामध्ये स्कॉटलँडने नेदरलँड्ससमोर 278 धावांचे लक्ष ठेवले होते.
या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नेदरलँड्सने 42.5 षट्कारांमध्ये सहा गडी गमावले होते. संघासाठी बास दी लीडने 133.70 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 92 चेंडूत 123 धावांची मोठी खेळी केली. तर त्याच्या या दमदार खेळीमध्ये 7 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.
नेदरलँड्सने सुरुवातीपासून केली उत्तम खेळी
धावांचा पाठलाग करताना सलामीवीर विक्रमजीत सिंहने 6 चौकारांच्या मदतीने 40 धावांची दमदार खेळी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर बस डी लीडने शतकांची खेळी करत संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. तर त्याने सामना जिंकण्यापूर्वी तीन चेंडू असताना त्याची विकेट गमावली.
दुसरा सलामीवीर मॅक्स ओ'डाऊडने 20 धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज वेस्ली बॅरेसीने 11 धावांची खेळी केली. त्याचवेळी साकिब झुल्फिकारने 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 33 नाबादची कामगिरी केली. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 3 चौकारांसह 25 आणि तेजा निदानुरूने 10 धावांची खेळी केली.
नेदरलँड्सचे गोलंदाज चमकले
नेदरलँड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी करताना बास दी लीडने 10 षट्कांत 52 धावा देत 5 बळी घेतले. याशिवाय रायन क्लेनला 2 आणि व्हॅन बीकने 1 बळी घेतला. तसेच या सामन्यातील दमदार खेळीमुळे बास डी लीडेला सामनावीराचा किताब देण्यात आला आहे.
विश्वचषकासाठी दहा संघ सज्ज
नेदरलँडच्या विजयानंतर 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी 10 संघ पूर्ण झाले आहेत. पहिले 8 संघ विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले होते. यानंतर दोन संघांसाठी क्वालिफायर सामने खेळवण्यात आले होते. ज्यामध्ये श्रीलंका आणि नेदरलँड्स पात्र ठरले असून त्यांनी विश्वचषकात स्थान मिळवले आहे. आता या स्पर्धेसाठी भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, पाकिस्तान, इंग्लंड, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँडसह एकूण 10 संघ निश्चित करण्यात आले आहेत.
5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान स्पर्धा रंगणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी फायनलचा सामना होणार आहे. तर 15 नोव्हेंबर रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी खेळण्यात येणार आहे. दहा मैदानावर भारतात होणाऱ्या विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.
हे ही वाचा :
विश्वचषकाआधीच बांगलादेशला धक्का, कर्णधाराने तडकाफडकी घेतली निवृत्ती