मुंबई : पुढील महिन्यात टी- 20 वर्ल्ड कप यूएईमध्ये खेळवला जाणार आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणाही झाली आहे. युजवेंद्र चहलला टी -20 विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात स्थान मिळाले नाही, त्यानंतर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चहल वगळता अन्य काही खेळाडूंचा समावेश न केल्यानेही निवड समितीवर निशाणा साधला जात आहे.


आयपीएल 2021 यूएईमध्ये खेळला जाणारा सीझन टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंसाठी महत्त्वाचा आहे. पुढील महिन्यात टी -20 विश्वचषक यूएईमध्येच आयोजित करण्यात येणार असून यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला निवड समितीने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. तर तीन खेळाडूंना राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र काही खेळाडूंना या संघात स्थान मिळू शकले नाही, जे काही महिन्यांपूर्वीपर्यंत संघाचे नियमित सदस्य होते. त्यापैकी एक म्हणजे लेगस्पिनर युजवेंद्र चहल एक आहे. मात्र काल झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) च्या सामन्यात चहलने रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध जबरदस्त कामगिरी करत सिलेक्टर्सना चोख उत्तर दिलं आहे.  


युजवेंद्र चहलच्या जागी मुंबई इंडियन्सकडून खेळणारा युवा फिरकीपटू राहुल चहरला टी 20 वर्ल्ड कप संघात संधी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत चहलकडे यूएईमध्ये आयपीएलमध्ये आरसीबीसाठी जबरदस्त कामगिरी करून निवडकर्त्यांना उत्तर देण्यापेक्षा दुसरा चांगला पर्याय नव्हता. 


हरभजन सिंहचा सिलेक्टर्सवर निशाणा


कालच्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात युजवेंद्र चहलने 4 षटकांत 1 मेडनसह फक्त 11 धावा दिल्या आणि 3 विकेट घेत सामन्यात निर्णायक भूमिका निभावली. दुबईच्या खेळपट्टीवर चहलने क्विंटन डी कॉक आणि इशान किशनची विकेट घेतली. अनुभवी भारतीय ऑफस्पिनर आणि कोलकाता नाईट रायडर्सचे सदस्य हरभजन सिंग यांनीही चहलच्या या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. हरभजनने ट्वीट केले, "मित्रांनो, चहलने आज वेगवान गोलंदाजी केली की धीमी? 4-11-3 किती शानदार स्पेल चॅम्पियन युझवेंद्र चहल." हरभजनने आपल्या पोस्टमधून सिलेक्टर्सवर निशाणा साधला आहे. 






दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाकडूनही प्रश्न उपस्थित


केवळ हरभजनच नाही तर दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी देखील संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले. शिखर धवन आणि चहलच्या वगळल्याने त्यांनीही ट्वीट केले. जिंदाल यांनी लिहिले, "निवडकर्ते देखील त्यांच्या निर्णयांवर चकीत होत असतील. आमल्या टी -20 संघात आमच्याकडील काही सर्वोत्तम फलंदाज नाहीत. कोण ते अंदाज लावता येईल?" पुढे आणखी एक ट्वीट करत त्यांनी म्हटलं की, "टी -20 मधील भारताचा सर्वोत्तम फिरकीपटूही गायब आहे." 






युजवेंद्र चहल व्यतिरिक्त सलामीवीर शिखर धवनलाही संघात स्थान मिळाले नाही. धवन आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळत असून त्याने या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. धवनच्या जागी इशान किशनचा टी 20 संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय पृथ्वी शॉ आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेले श्रेयस अय्यर देखील संघात स्थान मिळवू शकले नाहीत. दुखापतीतून परतलेल्या अय्यरला मात्र राखीव ठेवण्यात आले आहे.