Nupur Sharma News : भाजपच्या (BJP) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर (Prophet Mohammad) यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच पक्षाने निलंबन केलं असून देशभरातच त्यांच्याविरुद्ध विविध ठिकाणी आंदोलनं होत आहेत. जगातील बऱ्याच इस्लामिक राष्ट्रांनी या घटनेचा निषेध केला असून आता क्रिकेट जगतातूनही याप्रकरणी प्रतिक्रिया येत आहे. यामध्ये भारताचे माजी क्रिकेटर गौतम गंभीर, व्यंकटेश प्रसाद यांच्यासह पाकिस्तानच्या शोएब अख्तर यांनी ट्वीट करत आपआपलं मत नोंदवलं आहे.


यावेळी नूपुर यांच्या या वक्तव्याबद्दल व्यंकटेश प्रसाद याने ट्वीट करत एक फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांनी कर्नाटकमधील एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये नुपूर यांची प्रतिकृती रस्त्यावर लटकवण्यात आली आहे. या फोटोला ट्वीट करत प्रसाद याने हे सगळं पाहून आपण 21 व्या शतकात आहोत असं वाटत नाही, अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे.



दुसरीकडे गौतम गंभीरने ट्वीट करत लिहिलं आहे की,'माफी मागितली असतानाही एका महिलेला देशात जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. यावर कथित सेक्युलरवादी शांत बसले आहेत.



याशिवाय पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरनेही ट्वीट करत मोहम्मद पैगंबर आमच्यासाठी सर्वस्व असून आमचं जीवन-मरणं हे सर्व त्यांच्यासाठी आहे. हा असा प्रकार भविष्यात अजिबात घडता कामा नये, असंही अख्तर म्हणाला. 



काय वाद आहे?


एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील लोक संतप्त झाले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी म्हटलं होतं की, हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर नुपूर यांच त्वरीत निलंबन भाजप पक्षाकडून करण्यात आलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या