Nupur Sharma :  एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा यांना भोवण्याची शक्यता आहे. नुपुर शर्मा यांच्याविरोधात मुंबईत रझा अकादमीने एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील पायधुनी पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला. 


एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा सहभागी झाल्या होत्या. या चर्चेदरम्यान नुपुर यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली. या वक्तव्यामुळे मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या असल्याचे रझा अकादमीने म्हटले. याबाबत रझा अकादमीने मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी पायधुनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास सांगितले. पायधुनी पोलिसांनी नूपूर शर्मा यांच्याविरोधात IPC 295A, 153A आणि 505B या कलमांतर्गत रात्री उशिरा तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, नुपुर शर्मा या आधीदेखील आपल्या ट्वीट, वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेल्या आहेत. 


देशभरात नाराजी, कारवाईची मागणी


नुपुर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली आहे. एमआयएमनेदेखील नुपुर शर्मा यांच्याविरोधात हैदराबादमध्ये तक्रार दाखल केली आहे. नुपुर शर्मा यांच्या अटकेची मागणी एमआयएमने केली आहे.


नॅशनल कॉन्फरन्सनेदेखील नुपुर शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.  भाजप आणि केंद्र सरकारने या बेताल वक्तव्याबाबत माफी मागावी अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्सने केली. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आडून भाजपचे नेते बेताल वक्तव्ये करू शकत नाही, असेही नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सलमान अली सागर यांनी म्हटले. 


पाहा व्हिडिओ:  Bjp Nupur Sharma यांच्याविरोधात मुंबईत एफआयआर दाखल, पैगबरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप


 



 


इतर महत्त्वाच्या बातम्या: