Virat Kohli : भारतीय संघ विश्वचषकासाठी (World Cup) सज्ज झालाय. गुवाहाटीमध्ये इंग्लंडविरोधातील (IND vs ENG) सराव सामना पावसामुळे रद्द झाला. आता दुसरा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ तिरुअनंतपूरममध्ये दाखल झाला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेत्वातील भारतीय संघाचे तिरुअनंतपूरममध्ये विमानतळावर खेळाडूंचे  जंगी स्वागत झाले. खेळाडूंच्या स्वागतासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तिरुअनंतपूरममध्ये भारतीय संघ (Team india) विराट कोहलीशिवाय दाखल झाला. विराट कोहली घरगुती कारणासाठी गुवाहाटीवरुन मुंबईला गेलाय. दोन दिवसांपासून अनुष्का शर्माच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा होत्या. त्यानंतर विराट कोहली तातडीने मुंबईला (Mumbai) रवाना झाल्यामुळे या चर्चेला अजूनच बळ मिळाले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळपर्यंत विराट कोहली तिरुअनंतपूरममध्ये टीम इंडियासोबत जोडला जाणार आहे.





तिरुअनंतपूरममध्ये भारत आणि नेदर्लंड यांच्यामध्ये सराव सामना होणार आहे. इंग्लंडविरोधातील सराव सामना पावसामुळे वाया गेला होता. या सामन्यात एकही चेंडू फेकला गेला नाही. आता विश्वचषकाच्या तयारीला टीम इंडियाकडे अखेरची संधी असेल. दरम्यान, भारतीय संघ विश्वचषकात आठ ऑक्टोबरपासून आपल्या अभियानाची सुरुवा करणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात आहे.






भारताचा पहिला सराव सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे विश्वचषकाआधी भारतीय संघाकडे सराव करण्याची ही अखेरची संधी असेल. भारत आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये 12 वर्षांनतर सामना होत आहे. भारत आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. यामध्ये दोन एकदिवसीय आणि एक टी20 सामना आहे. भारत आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये पहिला वनडे सामना 2003 मध्ये झाला होता. या सामन्यात भारताने 68 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसरा आणि अखेरचा वनेड सामना 2011 मध्ये झाला होता. हा सामना भारताने पाच विकेट्सने जिंकला होता. हा सामना दिल्लीमध्ये पार पडला होता. आता 12 वर्षांनंतर हे दोन्ही संघ वनडेमध्ये आमनेसामने आले आहेत. 


अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा प्रेग्नंट ?


अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. पण विरुष्काने मात्र अद्याप चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिलेली नाही.अनुष्का शर्माला मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर स्पॉट करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.