Team India WORLD CUP 2023 : भारतीय संघाची विश्वचषकाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. रविंद्र जाडेजाचा फलंदाजी फॉर्म वगळता सर्व खेळाडू भन्नाट फॉर्मात आहेत. ऑस्ट्रेलिया विरोधात भाराताने वनडे मालिका जिंकली, त्याआधी आशिया चषकावर नाव कोरले होते. या मालिकेत भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. आगामी विश्वचषकात भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय. या विश्वचषकात भारतासाठी तीन खेळाडू गेम चेंजर ठरु शकतात. यामध्ये मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि आर. अश्विन या तीन खेळाडूंचा समावेश आहे. या तिघांची कामगिरी कशी आहे, ते पाहूयात


मोहम्मद सिराज -


मोहम्मद सिराज सध्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. मागील दोन वर्षात सिराजने भेदक मारा केलाय. सिराजने आतापर्यंत 30 वनडे सामन्यात 54 विकेट घेतल्या आहेत. आशिया चषकाच्या फायनलमध्ये सिराजने भेदक मारा केला होता. श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना तंबूत पाठवले होते. सिराजने 21 धावांच्या मोबदल्यात सहा विकेट घेतल्या होत्या. सिराजचा हा पहिलाच विश्वचषक असेल. जसप्रीत बुमरहाच्या जोडीने सिराज भारताची गोलंदाजी सांभाळणार आहे. सिराजकडून भारतीय चाहत्यांना मोठ्या आपेक्षा आहेत. सिराज भारतासाठी गेम चेंजर ठरु शकतो. 


कुलदीप यादव -


टीम इंडियासाठी कुलदीप यादव शानदार कामगिरी करत आहे. अनेकदा कुलदीपने एकट्याच्या जिवावर सामना जिंकून दिलाय. कुलदीप यंदाच्या विश्वचषकातही दमदार कामगिरी करण्यास सज्ज आहे. कुलदीप यादवने 90 वनडे सामन्यात 152 विकेट घेतल्या आहे. कुलदीप यादव भारताच्या सर्व मैदानावर खेळला आहे, त्याचा फायदा त्याला नक्कीच होईल. चायनामन कुलदीपच्या फिपकीपुढे प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडू शकते. कुलदीप भारातासाठी विश्वचषकात गेम चेंजर ठरु शकतो. 


रविचंद्रन अश्विन -


अक्षर पटेल याला दुखापत झाली अन् आर. अश्विनची टीम इंडियात एन्ट्री झाली. आर. अश्विन याच्याकडे विश्वचषक खेळण्याचा तगडा अनुभव आहे. 2011 मध्ये भारतात झालेल्या विश्वचषकात अश्विन टीम इंडियाचा भाग होता. आताही अश्विन भारतीय संघाचा भाग आहे. अश्विनच्या अनुभवाचा भारताला नक्कीच फायदा होईल. अश्विनने वनडेमध्ये आतापर्यंत 155 विकेट घेतल्या आहेत. घरच्या मैदानावर अश्विनला फायदा मिळू शकतो. डावखुऱ्या फलंदाज अश्विनच्या गोलंदाजीपुढे गुडघे टेकतात. अश्विनला भारतात खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. अश्विन भारतासाठी गेम चेंजर ठरु शकतो. 


5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ  - 


5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.