--------Team Australia : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचा एकाच वेळी दौरा करणार आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघांची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी -20 मालिका खेळणार आहे.


ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर कसोटी संघासह दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहेत. तर सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड टी -20 मालिकेसाठी टीमसह न्यूझीलंडला जाणार आहेत. न्यूझीलंड दौर्‍यावर ऑस्ट्रेलियन संघाला पाच सामन्यांची टी -20 मालिका खेळायची आहे. या मालिकेचे सामने 22 फेब्रुवारी, 25 फेब्रुवारी, 3 मार्च, 5 मार्च आणि 7 मार्च रोजी खेळवले जाणार आहेत.


न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ फेब्रुवारीला रवाना होणार आहे. तर बायो सिक्युरिटी उपायांचा आढावा घेतल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीन पेन संघाचा कर्णधार असेल. त्याचबरोबर अ‍ॅरॉन फिंच न्यूझीलंडविरुद्धच्या टी -20 मालिकेसाठी संघाचा कर्णधार असेल.


दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेडला ऑस्ट्रेलियाच्या संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी मर्यादित षटकांच्या सामन्यात विकेटकीपिंग करणारा अॅलेक्स कॅरीला संधी देण्यात आली आहे. मात्र वेड न्यूझीलंड दौर्‍यावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेत खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ एकाच वेळी दोन देशांचा दौरा करणार आहे.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपले मुख्य खेळाडू निवडले आहेत. या संघात डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लब्युचेन, पॅट कमिन्स, जोश हेझलवुड आणि मिशेल स्टार्क यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात होते. परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या टी -20 मालिकेसाठी अनेक नवीन खेळाडूंना ऑस्ट्रेलियन संघात स्थान देण्यात आले आहे. यात तनवीर सांगा, डॅनियल सॅम्स, जोश फिलिप, झाय रिचर्डसन, जेसन बेहरेनडर्फ आणि अॅश्टन टर्नर अशा खेळाडूंचा समावेश आहे.


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ


टिम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स, सीन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅब्युचेन, एम हेनरिक्स, नॅथन ल्यॉन, मायकेल नासेर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्स्की, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्क स्टेकी, मिशेल स्वॅपसन आणि डेव्हिड वॉर्नर.


न्यूझीलंडविरूद्ध टी -20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ


अ‍ॅरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, अॅश्टन एगर, जेसन बेहरेनड्रफ, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅकडर्मॉट, रिले मेरिडिथ, जोश फिलिप, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, तनवीर सांगा, डी अर्शी शॉर्ट, मार्कस स्टॉयनिस, अ‍ॅस्टन टर्नर, अॅन्ड्र्यू टाय आणि अॅडम झम्पा.