Cricket Australia Team of the World Cup 2023 : भारतात होत असलेल्या विश्वचषकातील उपांत्य फेरीचे चार संघ निश्चित झालेत. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलेय. साखळी फेरीतली 45 सामन्यानंतर अनेकांनी बेस्ट प्लेईंग 11 ची घोषणा केली. यामध्ये आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचीही भर पडली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले नाही. पण 4 खेळाडूंना प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय.  यामध्ये पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला स्थान मिळाले नाही.


विराट कोहली कर्णधार -


क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या विश्वचषकाच्या संघात क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड वॉर्नर यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. तर न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रला  तिसऱ्या क्रमांकासाठी निवडलेय. भारताचा दिग्गज विराट कोहलीवर चौथ्या क्रमांकाची जबाबदारी दिली आहे. त्याशिवाय विराट कोहलीला या संघाचा कर्णधारही केलेय. क्विंटन डिकॉक याच्याकडे विकेटकीपरची जबाबदारी दिली आहे. विराट कोहलीशिवाय मधल्या फळीत एडन मार्कराम आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे फलंदाज आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू मार्को यानसन आणि भारतीय दिग्गज रवींद्र जडेजा यांना अष्टपैलू म्हणून संघात स्थान मिळाले आहे.


शामी - बुमराह यांनाही स्थान -  


ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात भारताच्या दोन वेगवान गोलंदाजांना स्थान दिलेय. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांची वेगवान गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झाम्पाला फिरकीपटू म्हणून स्थान मिळाले आहे. याशिवाय 12वा खेळाडू म्हणून श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंकाची निवड करण्यात आली आहे.






विश्वचषकात क्विंटन डिकॉक याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. विकेटकीपर फलंदाज डि कॉकने आतापर्यंत 9 सामन्यात  65.67 च्या सरासरीने 591 धावा चोपल्या आहेत. विराट कोहली यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. त्याने दोन शतके आणि पाच अर्धशतकाच्या मदतीने 594 धावा चोपल्या आहेत. न्यूझीलंडच्या रचिन रविंद्र याने सर्वांनाच प्रभावित केलेय. त्याने 565 धावा काढल्या आहेत. तर मॅक्सवेल याने 397 धावांचा पाऊस पाडला आहे. मार्को यान्सन याने गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल केली आहे. त्यामुळे त्याची निवड करण्यात आली आहे. यानसन याने आतापर्यंत 17 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय फलंदाजीतही मोलाचे योगदान दिलेय.  जाडेजाने आतापर्यंत 16 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय तो तळाला चांगली फलंदाजी करतो. त्याने न्यूझीलंडविरोधात ती धमक दाखवली. 


क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेली टीम ऑफ वर्ल्ड कप-


क्विंटन डीकॉक, डेविड वार्नर, रचिन रवीन्द्र, विराट कोहली (कर्णधार), एडन मार्करम, ग्लेन मॅक्सवेल, मार्को यानसन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शामी, एडम जम्पा, जसप्रीत बुमराह, दिलशान मधुसंका (राखीव खेळाडू)