Ashes 2021-22: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं किक्रेट क्षेत्रावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. कोरोनामुळं अनेक क्रिकेट स्पर्धा आणि मालिका रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेला येत्या 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियात पार पडणार आहे. याचदरम्यान, अॅशेस मालिकेतील पाचव्या सामन्याबाबत महत्वाची माहिती समोर आलीय. 


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं अॅशेस मालिकेतील पाचवा कसोटी सामना पर्थच्या मैदानावर खेळला जाणार नाही, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सोमवारी दिली. लवकरच या कसोटीसाठी पर्यायी ठिकाण जाहीर करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलंय. "अशॅस मालिकेतील पाचवा कसोटी सामना पर्थमध्ये खेळणे शक्य नाही. डब्लूए सरकार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि डब्लूए क्रिकेटच्या संबंधित प्राधान्यक्रम लक्षात घेता ते शक्य नाही. आम्ही योग्य वेळी पर्यायी ठिकाणाबद्दल माहिती देऊ", असं ऑस्ट्रेलिया क्रिकेटनं म्हटलंय.


ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 8-12 डिसेंबर दरम्यान अॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना 16-20 डिसेंबर दरम्यान अॅडलेड येथे होणार आहे. तिसरा सामना 26-30 डिसेंबर दरम्यान मेलबर्न आणि चौथा कसोटी सामना 5-9 जानेवारी दरम्यान सिडनी येथे पार पडणार आहे. तर, पाचवा कसोटी सामना 14-18 जानेवारी दरम्यान पर्थ येथे खेळला जाणार होता. 


ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये 2019 मध्ये खेळण्यात आलेल्या अॅशेस मालिका 2-2 बरोबरीत सुटली होती. यंदाच्या अॅशेस मालिकेत कोणता संघ बाजी मारणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-