Virat Kohli On Cheteshwar Pujara And Ajinkya Rahane Future : दक्षिण अफ्रीकाविरोधात तीन कसोटी मालिकाविरोधात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंना आपल्या लौकिकास साजेशी काम करण्यात अपयश आले. निर्णायक कसोटी मालिकेनंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या कामगिरीवर कर्णधार विराट कोहलीला प्रश्न विचारण्यात आला. यावर विराट कोहलीला त्यांचा पूर्णपणे बचाव करता आला नाही. हा प्रश्न विराट कोहलीने निवड समितीकडे सोपवला आहे.  


चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी भारतीय फलंदाजांनी आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत निराशाजनक कामगिरी केली. या दोघांना मागील दीड-दोन वर्षांत धावांसाठी झगडावे लागल्याने त्यांचे कसोटी संघातील स्थान धोक्यात आले आहे. मात्र, कर्णधार कोहलीने त्यांच्या भविष्याबाबत काहीही स्पष्टपणे बोलणे टाळले. पुजारा आणि रहाणेच्या जागी युवा खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे का?, असे विचारले असता कोहली म्हणाला, भविष्यात काय होणार हे मी आताच सांगू शकत नाही. हे निर्णय माझ्या हातात नाहीत. तुम्ही हे प्रश्न निवडकर्त्यांना विचारा. ते काय निर्णय घेणार हे मला इथे बसून सांगणे अवघड आहे. विराट कोहलीच्या या उत्तरानंतर आता श्रीलंकाविरोधातील कसोटी मालिकेत पुजारा-रहाणेला संधी मिळणार का? याची उत्सुकता लागली आहे.


दक्षिण आफ्रिकाविरोधात नुकत्याच झालेल्या तीन कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना अपयश आले. परिणामी भारताचा मध्यक्रम पूर्णपणे ढासाळला. पुजाराने सहा डावांत 20.67 च्या सरासरीने 124 धावा केल्या आहेत. तर अजिंक्य रहाणेने 22.67 च्या सरासरीने 136 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा भारताच्या मध्यक्रमला बळकटी देतात. पण दक्षिण आफ्रिकाविरोधातील कसोटी मालिकेत दोघांना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. परिणामी पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या भारताला पुढील दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. गेल्या काही दिवसांपासून पुजारा आणि रहाणे यांच्या कामगिरीत सातत्या दिसत नाही. दोघांनाही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर टीकेचा पाऊसही पडत आहे. परिणामी या दोन्ही दिग्गजांची संघातील जागा पक्की नसल्याचे म्हटले जात आहे.