Brett Lee to Jasprit Bumrah : ब्रेट लीचा बुमराहला खास सल्ला, दुखापतीतून सावरण्यासाठी दिला खास कानमंत्र
Brett Lee Suggetion To Jasprit Bumrah : दुखापतीमुळे आगामी टी20 विश्वचषकातून जसप्रीत बुमराह संघाबाहेर गेला आहे. ज्यानंतर आता ब्रेट ली याने बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी खास सल्ला दिला आहे.
Jasprit Bumrah Injury : भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे आगामी टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2022) संघातून बाहेर झाला आहे. ही दुखापत बुमराहसह भारतीय संघासाठीही मोठी तोटादायक आहे. कारण बुमराहवर गोलंदाजीची अधिक धुरा सध्या संघात आहे. तो एकमेक अनुभवी आणि दमदार डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असल्याने संघात त्याचं स्थान महत्त्वाचं आहे. दरम्यान आता बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी खास कानमंत्र ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett lee) याने दिला आहे.
ब्रेट ली त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला, "सध्या बहुतेक गोलंदाज जिममध्ये व्यायम करताना अधिकाधिक वजन उचलतात. जिममध्ये व्यायम करणं आवश्यक आहे, पण तुम्ही जास्त वजन उचलण्याची गरज नाही. जर तुम्हाला वेगवान गोलंदाजी करायची असेल तर तुमच्या शरीरात पातळ स्नायू असणं महत्त्वाचं आहे. जास्त वजन उचलल्याने हाताची हालचाल कमी होते." हा सल्ला देत बुमराहला अधिक वजन न उचलण्याचा सल्ला लीने दिला आहे.
बुमराहला पाठीची दुखापत
29 सप्टेंबर रोजी समोर आलेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यापासून खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात तो खेळणार नसल्याचं पीटीआयनं बीसीसीआयच्या सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं होतं. बुमराह इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर आशिया कप सामन्यांनाही मुकला. त्यानंतर विश्वचषकाची तयारी म्हणून बुमराहला संघात पुन्हा बोलवण्यात आलं त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे दोन सामने तो खेळला पण आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तो दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. दरम्यान बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी योग्य वेळ दिला न गेल्याने तो आता पुढील काही महिने सामने खेळू शकणार नाही असं दिसून येत होत, ज्यानंतर आता तो संपूर्ण टी20 विश्वचषकाला मुकणार हे समोर आलं आहे.
बुमराहला पर्याय काय?
टी-20 विश्वचषकातील राखीव खेळाडूंमध्ये दीपक चाहर आणि मोहम्मद शामी दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे, संघातील महत्वाचा खेळाडूला दुखापत झाल्यास राखीव खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवलं जातं. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत दीपक चाहरनं चांगली गोलंदाजी केलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात दीपक चाहरनं चार षटकात 24 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. परंतु, जसप्रीत बुमराहऐवजी कोणाला भारतीय संघात संधी मिळेल? हा प्रश्न उपस्थित होत आहे. दीपक चाहर, मोहम्मद शामी किंवा अन्य कोण? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
हे देखील वाचा-