R Ashwin Records : भारतीय संघाचा (Team India) स्टार अनुभवी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.दिल्ली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 100 बळी घेण्याचा रेकॉर्ड पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या आधी ही कामगिरी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) याने केली होती. दरम्यान नागपुर कसोटी सामन्यातील दोन्ही डावात मिळून अश्विनने एकूण 8 विकेट्स घेतल्या, ज्यासोबतच त्याने कसोटी फॉरमॅटमध्ये 450 बळींचा आकडाही पार केला होता. आता मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावातील पहिले तीन बळी घेताच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेण्याचा विक्रम नावे केला आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच रविचंद्रन अश्विनची उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. त्यामुळे या कसोटी मालिकेत खेळण्याआधी कांगारू संघही त्यांच्याविरुद्ध जोरदार तयारी करताना दिसत होता. मात्र नागपूर कसोटी सामन्यात अश्विनने दमदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी पार पाडली. आता दिल्ली कसोटी सामन्यातही पहिल्या डावात त्याने महत्त्वपूर्ण 3 विकेट्स घेतल्या (बातमी लिहिपर्यंत) आहेत. 


हा विक्रमही नावे करण्याची संधी


याशिवाय अश्विनने आतापर्यंत भारतात 25 वेळा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे आणि या बाबतीत तो अनिल कुंबळेसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. दिल्ली कसोटी सामन्यादरम्यान त्याने एका डावात 5 विकेट्स घेतल्यास तो अनिल कुंबळेला मागे टाकून या बाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचेल. दुसरीकडे, जर अश्विनने या सामन्यात 8 विकेट्स मिळविण्यात यश मिळवलं, तर तो माजी भारतीय कर्णधार कपिल देवच्या 687 आंतरराष्ट्रीय विकेट्सला मागे टाकून सर्व फॉरमॅटमध्ये भारतासाठी तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल. याशिवाय, अश्विनने दिल्ली कसोटी सामन्यात आणखी 6 विकेट्स घेतल्यास कपिल देवला मागे टाकून दिल्लीत सर्वाधिक कसोटी बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरेल.


सलामीच्या सामन्यात भारताचा दमदार विजय


नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (VCA Cricket Stadium) खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (India vs Australia 1st Test) भारताने एका मोठ्या आणि दमदार विजयाची नोंद केली. भारताने हा सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकाने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. 


हे देखील वाचा-