IND vs AUS Border Gavaskar Trophy 2024 पर्थ : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 च्या पहिल्या कसोटीला पर्थमध्ये सुरुवात होत आहे. यावेळी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने ऑस्ट्रेलियात होणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी उद्यापासून सुरु होणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकणं भारतासाठी महत्त्वाचं आहे. भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडू आहेत. विराट कोहली, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह भारतीय संघ पहिली कसोटी खेळणार आहे. या तिघांच्या जोडीला भारताचे युवा खेळाडू असतील. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा सामना कसा करायचा याचं आव्हान देखील ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर असणार आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर असलेला हार्दिक पांड्या कसोटी क्रिकेटपासून गेली बरीच वर्षे दूर आहे. मात्र, हार्दिक पांड्या कसोटी सामने का खेळत नाही, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
हार्दिक पांड्या का कसोटी खेळत नाही?
हार्दिक पांड्या आक्रमक फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. हार्दिक पांड्या सारखा ऑलराऊंडर संघात असणं भारतीय संघासाठी फायदेशीर ठरलं असतं मात्र, गेल्या काही वर्षांपासून हार्दिक पांड्यानं कसोटी सामना खेळलेला नाही. कसोटी क्रिकेटमधील हार्दिक पांड्याची कामगिरी चांगली राहिली आहे.मात्र, दुखापतीच्या कारणामुळं ऑगस्ट 2018 पासून हार्दिक भारतीय संघाकडून कसोटी सामना खेळलेला नाही. हार्दिक पांड्या फिटनेसच्या कारणामुळं कसोटी खेळत नाही, अशी माहिती आहे. 2018-19 पासून कंबर दुखापतीचा सामना हार्दिक पांड्या करत आहे. त्यानंतर काही काळ हार्दिक पांड्यानं गोलंदाजी करणं देखील बंद केलं होतं.
कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाजाला खूप ओव्हर गोलंदाजी करायची असते. दुखापतींचा सामना करणाऱ्या हार्दिक पांड्याला ते करणं शक्य नाही. त्यामुळं हार्दिक पांड्या अनेकदा वनडे सामन्यात देखील 10 ओव्हर गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाही. फिटनेसच्या कारणामुळं हार्दिक पांड्यानं 2018 नंतर कसोटी संघात पुनरागमन केलेलं नाही.
हार्दिक पांड्याची कसोटी कारकीर्द
हार्दिक पांड्यानं 11 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं एक शतक आणि चार अर्धशतकं केली आहे. त्याच्या नावावर एकूण 532 धावा आहेत. हार्दिकनं गोलंदाजी करताना 17 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटमध्ये हार्दिकनं 3469 धावा केल्या असून 173 विकेट घेतल्या आहेत. हार्दिकनं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हटलं की त्यानं जर कसोटी क्रिकेट खेळणं सुरु ठेवलं असतं तर त्याला वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नसती.
इतर बातम्या :
मराठवाड्यात मविआला धक्का बसणार, महायुती बाजी मारणार, axis MY INDIA च्या एक्झिट पोलचा अंदाज