मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान काल पार पडलं आहे. 288 जागांसाठी मतदान पार पडलं असून मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. त्यापूर्वीच विविध संस्थांचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. प्रदीप गुप्ता यांच्या एक्सिस माय इंडिया या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला महाराष्ट्रातील सत्ता मिळण्याचा अंदाज आहे. महायुतीला 178-200 तर महाविकास आघाडीला 82-102 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या संस्थेच्या पोलनुसार महायुतीला मराठवाड्यात चांगलं यश मिळू शकतं. महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळत नसल्याचा अंदाज एक्सिस माय इंडियानं वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात 46 जागा आहेत. यापैकी महायुतीला 30 जागा मिळतील, असा अंदाज एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर, महाविकास आघाडीला 15 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाड्यात मराठा आरक्षण, सोयाबीन आणि कापूस दराचा मुद्दा महत्त्वाचा होता. या मुद्यांचा निवडणुकीमध्ये मतदानावर नेमका किती परिणाम झाला हे पाहावं लागणार आहे. लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडीला मराठवाड्यात अधिक जागा मिळाल्या होत्या. मराठवाड्यातील 8 जागांपैकी 7 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. महायुतीला केवळ छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर विजय मिळाला होता.
एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार मराठवाड्यात कुणाला किती जागा?
मराठवाडा (46 सीट्स)
महायुती : 30
मविआ : 15
वंचित : 0
इतर : 1
-----------
मतांची टक्केवारी
महायुती : 45 %
मविआ : 38%
वंचित : 5%
इतर : 12%
एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार महायुतीला किती जागा?
महाराष्ट्रात axis MY INDIA च्या एक्झिट पोलनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार महायुतीला 178-200 जागा मिळू शकतात. महायुतीनं राज्यातील सर्व विभागांमध्ये मविआवर वर्चस्व मिळवेल, असा अंदाज आहे. महाविकास आघाडीला विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत काही प्रमाणात चांगल्या जागा मिळतील. तर, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात महायुतीला जास्त जागा मिळतील, असा अंदाज axis MY INDIA च्या एक्झिट पोलनं वर्तवला आहे.
एक्झिट पोलचे बहुतांश अंदाज महायुतीच्या बाजूनं
काल विविध संस्थांचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले होते. त्यापैकी 6 एक्झिट पोलनं महायुतीला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर, आज आलेल्या एक्सिस माय इंडिया आणि टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला कौल दाखवला जात आहे.
इतर बातम्या :